किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीवर असलेल्या शितळानगर (मामुर्डी) येथील स्मशानभूमीतील कामाला वेग आला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने महापालिकेकडे संबंधित कामाचे अंदाजपत्रक सादर केल्यानंतर निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. दाहिनीसह स्थापत्यविषयक कामासाठी एक कोटी ६६ लाख ५८ हजार ५३१ रुपयांची तरतूद केली असून, १८ महिन्यांची मुदत दिली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रथमच विद्युत/डिझेल/ गॅसदाहिनी सेवा उपलब्ध होणार आहे.
शितळानगर स्मशानभूमीत विविध सोयीसुविधांअभावी देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसर व महापालिका हद्दीत किवळे, विकासनगर व साईनगर (मामुर्डी) भागात राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील स्मशानभूमीत करावयाच्या कामांसाठी महापालिकेच्या अधिकाºयांमार्फत पाहणी करून विद्युत / डिझेल/ गॅसदाहिनी कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी बोर्ड सदस्य विशाल खंडेलवाल यांनी गतवर्षी डिसेंबर महिन्यात आयुक्त श्रावण हर्डीकर, तत्कालीन महापौर नितीन काळजे यांच्याकडे मागणी केली होती. तत्कातीन उपमहापौर शैलजा मोरे यांनीही मागणीस शिफारस पत्र दिले होते. आयुक्त व महापौर यांनी या कामास तत्त्वत: मान्यता दिली होती.आयुक्त हर्डीकर यांनी विद्युत/डिझेल दाहिनीसाठी साह्य करण्याचा प्रस्ताव या वर्षी १८ जानेवारीला मंजूर केला होता. त्या संदर्भाचे महापालिका शहर अभियंता यांचे पत्र कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व खंडेलवाल यांच्याकडे पाठविले होते. त्यानुसार शितळानगर (मामुर्डी) येथे विद्युत / डिझेल/गॅसदाहिनी बसविण्याचे व स्थापत्यविषयक सविस्तर अंदाजपत्रक महापालिकेकडे सादर केले होते. तसेच ना हरकत दाखला दिला होता.