किवळे : देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (मामुर्डी) येथील भुयारी मार्गावरील पुलाचे रखडलेले काम फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले होते. त्यानंतर मे महिन्यात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेले काम या एक महिन्यापासून पुन्हा रखडल्याची तक्रार नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे. कामामुळे देहूरोड ते मामुर्डीदरम्यानचा भुयारी मार्गातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यास आणखी किती महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावरील शितळानगर (मामुर्डी) येथील कॅन्टोंमेन्ट बोर्डाच्या जुन्या जकात नाक्याजवळ महामार्गावरील अरुंद पुलावरील छेद रस्त्यावर प्रचंड वर्दळ असल्याने सातत्याने अपघात होत होते. या ठिकाणी अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत़ तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने गेल्या साडेसहा वर्षांपूर्वी महामार्गाचे सहापदरीकरण करण्यास सुरुवात झाल्यांनतर मामुर्डी येथील भुयारी मार्गावरील पुलाचे रुंदीकरण करणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणे पुढे करीत कामात चालढकल करण्यात येत होती. याठिकाणी बोर्ड सदस्या सारिका नाईकनवरे यांनी उड्डाणपूल उभारण्याची, मागणी केली होती. गत वर्षी फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली दोनदा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.तसेच भाजपा सोशल मीडियाचे अध्यक्ष सूर्यकांत सुर्वे यांनी प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडे रखडलेले काम सुरू करण्याबाबत भेट घेऊन मागणी केली होती. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण लवकर होणे गरजेचे असल्याबाबत लोकमतने गतवर्षी पंधरा डिसेंबरच्या अंकात ‘रुंदीकरण रखडल्याने वाढले अपघातांचे प्रमाण’ या शीर्षकाने छायाचित्रासह सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जलवाहिन्यांचा अडथळा येत असल्याने पुलाचे आरेखनात बदल केल्याने पुलाचे काम रखडल्याचे तसेच जलवाहिनी स्थलांतर न करता लवकरच सदर पुलाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भुयारी मार्गावरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेगात सुरू केले मात्र गेल्या महिन्यापासून पुलाचे काम पुन्हा बंद झाले असून, त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांनी केली आहे.२०१६ मध्ये सुरूवातसुरुवातीला नोव्हेंबर २०१६ मध्ये भुयारी पुलाच्या रुंदीकरण कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र जानेवारी (२०१७) महिन्यांपासून पुन्हा काम रखडले होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच विकासनगर येथील महामार्गावरील छेद रस्ता बंद केल्याने सर्व वाहनचालक उलट दिशेने वळण घेण्यासाठी याच पुलावर येत असल्याने मोठी वर्दळ वाढली आहे.थेट महामार्गावर न्यावी लागतात वाहनेपुलाचे काम अर्धवट झालेले असून, भुयारी मार्गातून देहूरोड ते मामुर्डीकडे येणाऱ्या जाणाºया वाहनांना गेले सहा महिन्यांपासून थेट महामार्गावर वाहने न्यावी लागत असून, या ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे बसविले असले तरी वाहतूक पोलीस अगर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वाहतूक वॉर्डन नसल्याने मुख्य महामार्गावरून ये-जा करणारी वाहने अत्यंत वेगात येत असून, पादचाºयांना व दुचाकी तसेच चारचाकी वाहनांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे काम वेगात पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
मामुर्डी पुलावरील भुयारी मार्गाचे काम रखडलेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 2:48 AM