पुणे : लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वांत मोठ्या १६० फूट व्यास आणि २६३ फूट उंच घुमट असलेल्या तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वरमहाराज प्रार्थना सभागृहाचा लोकार्पण सोहळा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मंगळवारी पार पडला. या घुमटाच्या माध्यमातून जगाला विश्वशांतीचा संदेश दिला जाईल, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.
एमआयटी पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या घुमटाची उंची ताजमहल आणि व्हॅटिकन सिटी येथील सेंट पीटर्स बॉसिलिका घुमटापेक्षाही उंच आहे. घुमटाच्या बांधकामाला वर्ष २००५ पासून सुरूवात करण्यात आली होती. १३ वर्षांनंतर याचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर तिथे सुरू करण्यात आलेल्या विश्वशांती ग्रंथालयाचा परिसर हा जवळपास ६२ हजार ५०० चौरस फुटांमध्ये विस्तारीत आहे. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या घुमटाची उभारणी करण्यात आली आहे. विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या घुमटाला जगभरातील लोकांनी भेट द्यावी, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.
डॉ. कराड यांनी सांगितले, की विश्वशांती प्रार्थना सभागृहाची संकल्पना २००५ साली माझ्या मनात आली. त्यानंतर या घुमटाच्या कामाला सुरूवात केली. जगभरातील संत, तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचे पुतळे या सभागृहाच्या परिसरात उभारण्यात आले आहेत. स्वामी विवेकानंद यांनी भारत एकविसाव्या शतकात विश्वगुरू म्हणून पुढे येईल असे सांगितले होते. त्याचेच प्रतीक म्हणून या प्रार्थना सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.डॉ. आर. ए. माशेलकर म्हणाले, की जगाला वेगळी कल्पना आणि मानवकल्याणाचा संदेश या गोल घुमटाकार वास्तूच्या माध्यमातूनदिला जात आहे. मानवतेच्या अंतर्मनात शांतीचा नवा मार्ग आणि विकासाची दिशा जगाला देण्याचे काम घुमटाद्वारे होईल.
डॉ. विजय भटकर म्हणाले, की हा घुमट मानवकल्याण आणि शांतीचे मंदिर आहे. या ठिकाणी विज्ञान आणि अध्यात्माचा संगम आहे. सातशे वषापूर्वी संत ज्ञानेश्वरांनी ‘हे विश्वची माझे घर’ हा संदेश संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दिला होता, तोच संदेश आज या विश्वशांती डोमच्या माध्यमातून दिला जात राहील.संत ज्ञानेश्वरमहाराज प्रार्थना सभागृहाच्या लोकार्पणाबरोबरच महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून ४ दिवसीय जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये जगभरातील नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते असे सुमारे १२० वक्ते व्याख्याते व ३,००० प्रतिनिधी सहभागीहोत आहेत.संत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञांचे ५४ पुतळेसंत ज्ञानेश्वर सभागृह व त्याच्या परिसरात जगभरातील संत, तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचे ५४ पुतळे उभारण्यात आले आहेत. गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, स्वामी विवेकानंद, प्रभू रामचंद्र, गुरूनानक, भगवान महावीर, येशू ख्रिस्त, योगी अरविंद, मोझेस, अॅरिस्टॉटल, प्लेटो आदींचा समावेश आहे.