जेजुरी : चैत्र महिन्याच्या प्रारंभीच भर सोमवती अमावास्या असल्याने जेजुरीत आज सुमारे दोन लाखांवर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. रणरणत्या उन्हात अक्षरश: रांगेत उभे राहून भाविक दर्शन घेत होते. संपूर्ण गडकोट सदानंदाचा यळकोट आणि भंडारा-खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण करीत यात्रा पूर्ण करीत होता.दर वर्षी चैत्र महिन्यात राज्यभरातील भाविक आपापल्या कुटुंबकबिल्यासह जेजुरीला कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी येत असतात. या वर्षी चैत्र महिन्याच्या प्रारंभीच सोमवती अमावस्या आल्याने भाविकांना एक चांगला योग आला होता. यामुळे भाविक मोठ्या संख्येने देवदर्शन करण्यासाठी काल रविवारपासूनच जेजुरीत येत होता. आज सकाळी १०.४४ वाजता सोमवती अमावस्येला प्रारंभ होत असल्याने ग्रामस्थांनी भर सोमवती यात्रेचा निर्णय घेतला होता. संपूर्ण दिवसभर अमावस्या असल्याने भाविक मिळेल त्या वाहनाने जेजुरीत येत होते. दुपारी १ वाजता पेशव्यांच्या आदेशाने देवाच्या उत्सव मूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे, विश्वस्त सुधीर गोडसे, डॉ. प्रसाद खंडागळे, अॅड. वसंत नाझीरकर उपस्थित होते. गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून सोहळ्याने कऱ्हा स्नानासाठी कूच केले. या वेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. गडातील व गडकोटाच्या सज्जातील भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, तसेच ‘सदानंदाचा येळकोट’चा जयघोष करीत भंडारा-खोबऱ्याची मोठ्या प्रमाणावर उधळण करीत देवाला मान दिला. संपूर्ण गडकोट पिवळ्या जर्द भंडाऱ्यात न्हाऊन निघाला होता.तळपत्या सूर्यदेवाला साक्षी ठेवत पालखी सोहळा गडकोटातून कऱ्हा स्नानासाठी बाहेर पडला. खांदेकरी, मानकऱ्यांनी उत्सव मूर्तींची पालखी आपल्या खांद्यावर लीलया पेलत गडावरून शहरातील मुख्य नंदी चौकात आणली. तेथून ऐतिहासिक चिंचबागेतील होळकर मंदिराचा मान घेऊन जानुबाई चौकमार्गे शिवाजी चौकात सोहळा आला. तेथून कोथळे रस्त्याने सोहळ्याने कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी ५ वाजता देवाचे पुजारी, ग्रामस्थ मानकऱ्यांनी उत्सव मूर्तींना विधिवत स्नान घातले. यावेळी नदीवर उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी ही कऱ्हा स्नान उरकून यात्रेचे पुण्य मिळवले. यानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. कोथळे, रानमळा, कोरपडवस्ती, दवणेमळा येथील मान स्वीकारत रात्री ७ वाजता सोहळा ग्रामदेवता जानुबाई मंदिरासमोर विसवला. येथे ग्रामस्थांनी उत्सव मूर्तींचे दर्शन घेतले. रात्री उशिरा सोहळा गडकोटावर पोहोचला. पेशव्यांनी रोजमारा वाटप करून सोहळ्याची सांगता झाली. जेजुरी पालिका प्रशासनाकडून येणाऱ्या भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी टँकरचे नियोजन करण्यात आले होते. एसटी महामंडळाकडून ही जादा बसची सोय करण्यात आली होती. भर सोमवती यात्रा असल्याने कालपासूनच भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येत होते. वाहतुकीवर ताण येऊ नये म्हणून जेजुरीचे स.पो.नि. रामदास वाकोडे यांनी १० पोलीस अधिकारी ९७ पोलीस कर्मचारी आणि ३० होमगार्डसह चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)खिसेकापूंनी अनेकांचे खिसे केले साफभर सोमवती यात्रा असल्याने कालपासूनच भाविकांची येथे गर्दी होती. भाविकांकडून भंडारा-खोबऱ्याची खरेदी होत होती. भंडारा-खोबरे १८० ते २०० रुपये किलोने विकले जात होते. मात्र, भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांना मोठा त्रास झाला. शुद्ध आणि भेसळयुक्त भंडारा सहजतेने लक्षात येत नसल्यामुळे भेसळीचे प्रमाण खूप होते. याला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कायदेशीर पावले उचलणे गरजेचे होते.प्रशासनाकडून याबाबत कडक कारवाईची गरज असल्याचे भाविकांचे म्हणणे होते. आज प्रचंड उकाडा आणि कडक उन्हाळा जाणवत होता. याच्या त्रासाने मुंबई येथील एका भाविकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत भाविकाचे नाव मात्र समजू शकले नाही. उद्या गुढी पाडवा व नववर्ष असल्याने भाविकांनी आज पहाटेपासूनच मोठी गर्दी केलेली होती. या गर्दीचा फायदा उठवत खिसेकापूंनी अनेकांचे खिसे साफ केले. पोलिसांनी मात्र याबाबत माहिती दिली नाही.अन् अश्व उधळले...पालखी सोहळा ऐतिहासिक चिंचबागेतील होळकरांचा मान घेऊन ग्रामदेवता जानुबाई मंदिराकडे येत असताना अत्रे पुलाजवळ भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर उधळण्यात येणाऱ्या भंडारा व खोबऱ्याचा मारा आणि भंडारा डोळ्यात गेल्याने देवाचे अश्व उधळले होते. अश्व सांभाळणारे मानकरी दिलावरभाई अश्वाबरोबर साधारणपणे १० ते १५ फूट फरफटत गेले. यात ते जखमी झाले. याप्रसंगी उपस्थितांनी त्वरित अश्वाला काबूत आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
रणरणत्या उन्हात सदानंदाचा यळकोट
By admin | Published: March 28, 2017 2:10 AM