- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अकरा महिन्यांत विविध कारणांमुळे भाजल्याने मृत्यू पडलेल्यांची संख्या अधिक आहे. भाजलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. मात्र, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जळीत कक्षच (बर्न वॉर्ड) नसल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी, वेळेत उपचार न झाल्याने रुग्ण दगावल्याची संख्या अधिक आहे. तळवडेतील दुर्घटनेनंतर बर्न वाॅर्डचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह महापालिकेची नऊ रुग्णालये आहेत; परंतु त्यातील कोणत्याही रुग्णालयात जळीत कक्ष नाही. ‘वायसीएम’मध्ये जळीत कक्ष नसल्याने केवळ प्रथमोपचार केले जातात. त्यामुळे भाजलेल्या रुग्णांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करावे लागते. योग्य उपचारासाठी रुग्ण ‘ससून’मध्ये दाखल होईपर्यंत उशीर झालेला असतो. परिणामी ते दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.
तळेवडेतील मेणबत्ती-शोभेचे फटाके बनविणाऱ्या कंपनीला शुक्रवारी (दि. ८) आग लागून तेथील कामगार महिला भाजल्या होत्या, त्यात सहा जणींचा मृत्यू झाला. त्यांना प्रथमत: ‘वायसीएम’मध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, बर्न वॉर्ड नसल्याने ‘ससून’मध्ये दाखल करावे लागले. भाजलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा असतो. त्यामुळे त्यांना ‘ससून’शिवाय पर्याय उरत नाही.
गेल्या वर्षी पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या घटनांत २१३ जण भाजले होते. यंदा ऑक्टोबरपर्यंत ‘वायसीएम’मध्ये १२३ जळीत रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यात ४० ते ७० टक्क्यांपेक्षा अधिक भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. यात विविध कंपन्यांतील दुर्घटना, शॉर्टसर्किट अथवा अन्य कारणांमुळे लागलेली आग, स्टोव्हचा भडका, गॅस गळती, पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न आदींमुळे भाजण्याच्या घटना घडल्या आहेत.
चौदा वर्षांपूर्वीच दिला प्रस्ताव
जळीत रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्यकता असल्याचे लक्षात घेऊन तत्कालीन मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागकुमार कुणचगी यांनी २००९ मध्ये प्रस्ताव मांडला होता. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यानंतर थेरगावला बर्न वाॅर्ड बनविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, त्या प्रस्तावांचा सर्वांनाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.
सद्य:स्थितीत ‘वायसीएम’मध्ये जागा कमी आहे. त्यामुळे तिथे बर्न वाॅर्ड करता येणार नाही. मात्र, शहरात इतर ठिकाणी तो करण्यासाठीचा विचार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका