पिंपरी : मृतदेह बदलल्याने दुसऱ्याच महिलेवर नातेवाईक समजून अंत्यसंस्कार केले. ही बाब समजल्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर रुग्णालयात तोडफोड झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि. १९) दुपारी हा प्रकार घडला.
स्नेहलता अशोक गायकवाड (वय ६१) आणि मीना बाळू गाडे (वय ५७) असे मृतदेह अदलाबदली झालेल्या मयत महिलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील स्नेहलता गायकवाड या मंगळवारी (दि. १८) दुपारी तीनच्या सुमारास त्यांच्या घराजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी तेथील भिंत पडून स्नेहलता जखमी झाल्या. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वायसीएम रुग्णालयात बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, दुर्धर आजारामुळे मृत्यू झालेल्या मीना गाडे यांचेही बुधवारी सकाळी वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यावेळी स्नेहलता गायकवाड आणि मीना गाडे यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात पोहचले. त्यावेळी गाडे कुटुंबियांच्या ताब्यात स्नेहलता गायकवाड यांचा मृतदेह देण्यात आला. गाडे कुटुंबियांनी तो मृतदेह थेरगाव येथील स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी स्नेहलता गायकवाड यांचे नातेवाईक देखील मृतदेह घेण्यासाठी आले असता, त्यांच्या ताब्यात मीना गाडे यांचा मृतदेह देण्यात आला. मात्र, हा मृतदेह स्नेहलता गायकवाड यांचा नसल्याचे गायकवाड कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे मृतदेह बदलल्याचा प्रकार उघडकीस आला. स्नेहलता गायकवाड यांच्या मृतदेहावर गाडे कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे गायकवाड कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी संताप व्यक्त केला.
वायसीएम रुग्णालय प्रशासनाच्या वाईट कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. तसेच काही जणांनी रुग्णालयातील दालनाच्या काचा फोडून तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडे आणि गायकवाड कुटुंबियांशी चर्चा करून पोलिसांनी मीना गाडे यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर गाडे कुटुंबियांनी मीना गाडे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तसेच गायवाकड कुटुंबियांनी थेरगाव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्काराचा विधी केला.