पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे. शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून ही माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी वाकड प्रभागातून तीन नगरसेवक निवडून आणले होते. शहरातून एकूण ९ सदस्य निवडून आल्याने त्यांची वर्णी महापालिकेच्या गटनेतेपदी निवड झाली होती. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. महापालिका निवडणुकीत वाकड परिसरातून अधिक जागा मिळाल्याने कलाटे यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपविली होती. संघटनात्मक काम आणि महापालिकेतील गटनेतेपद अशा दोन्ही जबाबदाऱ्यांना न्याय मिळायला हवा, म्हणून शहरप्रमुखपद अन्य पदाधिकाऱ्यास द्यावे, अशी मागणी कलाटे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जून महिन्यात केली होती. त्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुखपद कोणाला याबाबत चर्चा रंगली होती. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माजी गटनेत्या सुलभा उबाळे, खासदार श्रीरंग बारणे यांनी योगेश बाबर यांच्या नावाची शिफारस केली होती. या पदासाठी चिंचवडप्रमुख गजानन चिंचवडे यांच्या नावाचीही चर्चा होती. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणने ऐकुण घेतले होते. त्यानंतर आता निवड झाली आहे.योगेश बाबर यांच्याकडे पिंपरी विधानसभेचे प्रमुखपद होते. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी कापली होती. त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. बंडखोरी केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली होती. माझ्यावरील अन्यायाविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांना शहरप्रमुखपद बहाल करण्यात आले आहे.
माजी खासदार बाबर यांना शह देण्यासाठीबाबर यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे, वडील मधूकर बाबर, चुलते प्रकाश बाबर, चुलती शारदा बाबर यांनी नगरसेवकपद भूषविले असून दुसरे चुलते गजानन बाबर हे शिवसेनेचे आमदार व खासदार राहिले आहेत. बाबर कुटुंबीय हे मूळचे साताऱ्याचे असून पिंपरी-चिंचवडमध्ये राहतात. खासदार बाबर यांनी शिवसेनेला रामराम ठोकून, मनसेमार्गे भाजपाशी सलगी साधल्याने त्यांना शह देण्यासाठी त्यांच्याच बंधूंच्या मुलाला शिवसेनेचे शहरप्रमुख दिले आहे.