पुणे : सध्या देशात उन्नाव, कथुआ येथे चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात रोष दिसून येत आहे प्रत्येक जण आपल्या परीने त्याचा निषेध करत आहे. परंतु, केवळ निषेध न करता मुलींनी लढायला शिकले पाहिजे, ही भावना मनात ठेवून त्याच्या प्रत्यक्ष कृतीला सुरवात करण्यात आली आहे. धनकवडी येथे मुलींना कराटेचे धडे देऊन ‘कणखर बनून लढा द्या’ असाच संदेश देण्यात येत आहे. या उपक्रमाला अनेकांची साथ मिळाली असून, अनेक मुली या उपक्रमात सहभागी होऊन लढण्याचे धडे गिरवत आहेत.जागृती सोशल फांउडेशन, जनसेवा ट्रस्ट कात्रजतर्फे हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुलींनी आत्मसंरक्षण कसे करावे, याचे धडे येथे त्यांना मिळत आहेत. नॅशनल कराटे चॅम्पियन पूर्वा वाडकर या त्यांना शिकवत आहेत. त्यांना जागृती फांउडेशनचे अध्यक्ष डॉ. विशाल मोहिते-पाटील, उपाध्यक्ष राजेश सूर्यवंशी, राजकिरण सूर्यवंशी, विठ्ठल जाधव, रागिणी राजमाने, कादम्बिनी पाटील सहकार्य करीत आहेत. देशात घडलेल्या अत्याचाराचा निषेध करताना अनेकांनी उपोषण केले, कुणी मोर्चे काढले, कुणी व्हॉट्सअॅपवर काळे डीपी ठेवले, तर कुणी मेणबत्ती हातात धरून श्रद्धांजली वाहिली. या विषयावर चर्चा होत असताना कात्रज परिसरातील जनसेवा ट्रस्टतर्फे जरा वेगळा उपक्रम घेण्याचा विचार झाला. मुलींसाठी सात दिवस कराटेचे प्रशिक्षण देण्याचे शिबिर घेण्याचे ठरविण्यात आले. त्यातून या मुली भविष्यात काही संकट आले, तर स्वत:चे संरक्षण नक्कीच करू शकतील, हा त्या उपक्रमा मागील हेतू आहे. हे काम छोटे असले, तरी त्यातून काही तरी परिणामकारक होणार आहे. हे शिबिर सुरू करून पीडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली.मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावाप्रत्येकाची निषेध करण्याची पद्धत वेगळी असते. त्यातून मुलींना कराटेचे धडे देऊन त्यांना कणखर बनविण्याची ही पद्धत जरा अनोखी आणि नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. या शिबिरामुळे मुलींमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे असा जरा वेगळा निषेध करण्याचे आम्ही ठरविले, असे डॉ. विशाल मोहिते-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ऐसी धाकड हैं तू... धाकड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 6:00 AM