पिंपरी : सर्व सामान्यांच्या हिताला प्राधान्य देणारं हे सरकार आहे. शासन म्हणजे असं वेगळ मोठं काही नाही. आपण म्हणजेच शासन होय. अर्थात सर्वसामान्य माणसे हेच खऱ्या अर्थाने शासन आहेत, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
दिंडोरीप्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्यातर्फे मोशी येथे शनिवारी महासत्संग मेळावा झाला. यावेळी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, जनतेचे हित, जनकल्याणासाठीच आपण काम केले पाहिजे. त्यामुळे सामान्यांना सुख, समाधानाचे दिवस येतील. अध्यात्मिक विकासातून राष्ट्र विकास साधता येतो. हेच या महासत्संग मेळाव्याचे ध्येय आहे. शासन पोहचू शकत नाही तेथे गुरुमाऊलींचे कार्य पोहोचते. या कार्याच्या माध्यमातून शासनाच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचत आहेत. आम्ही राज्यकर्ते काम करतो आम्हाला अशा व्यक्तींकडून, उपक्रमांतून प्रेरणा मिळते. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शासन यासाठी प्रयत्न करीत आहे.
‘मी मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही’महासत्संगाच्या या अध्यात्मिक कार्यक्रमाला मी मुख्यमंत्री आहे म्हणून आलेलो नाही. तर, तुमच्या परिवारातील एक सदस्य म्हणून येथे आलो आहे. येथे आलेल्या प्रत्येकाने येथून जाताना समाजासाठी काहीतरी चांगले घेऊन जावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.