पिंपरी : क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळण्यासाठी माहेरून पैसे घेऊन येण्यास सांगितले. विवाहितेने त्यास नकार दिल्याने तिला क्रुरतेची वागणूक दिली. तसेच मुलगी झाल्याने विवाहितेला दुषने दिली. प्राधिकरण निगडी व कृष्णानगर, चिखली येथे २१ एप्रिल २०१४ ते १० मार्च २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.
पीडित फिर्यादी महिलेने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू, सासरे, नणंद व नणंदेचा पती यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती व सासरा यांना मद्यपान, क्लबमध्ये बायकांवर पैसे उधळणे, असे घाणेरडे नाद आहेत. त्या कारणासाठी फिर्यादीने तिच्या आईवडिलांकडून पैसे आणावेत, तसेच लग्नामध्ये महागड्या गाडीची मागणी केलेली होती. लग्नामध्ये फिर्यादीच्या आईवडिलांनी दिलेले स्त्रीधन देखील फिर्यादीस परत दिले नाही. तसेच आरोपी सासरा याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मुलगी झाल्याने तू अपशकुनी आहे, असे म्हणून सासू व नणंद यांनी दुषने दिली. आरोपींनी फिर्यादीला क्रुरतेची वागणूक दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.