पवनानगर : मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरात पिकनिक साठी आलेल्या १८ युवक व युवती मधील एक तरुण रविवारी (दिनांक 23 एप्रिल) दुपारी पवना धरण जलाशयात बुडाला होता. त्याचा शोध घेण्यात आणि त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यंत्रणांना अखेर दुसऱ्या दिवशी सोमवारी यश आले आहे. फांगणे गावच्या हद्दीत पवना धरण जलाशयात ही घटना घडली.
साहिल विजय सावंत (वय १८, रा. लोअर परेल, मुंबई) असे पवना धरणात बुडून मृत पावलेल्या सदर तरुणाचे नाव आहे. शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, वन्यजीव रक्षक दल मावळ, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था रायगड यांच्या संयुक्त शोध मोहिमेला सोमवारी (दिनांक २४ एप्रिल रोजी दुपारी ०१:४५ वाजता) यश आले आहे.
मुंबई भागातून १८ युवक-युवतींचा एक ग्रुप पवनाधरण भागात फिरायला आला होता. तेव्हा त्यातील काहींना धरणाच्या पाण्याच पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यातीलच साहिल हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन बुडाला. त्याच्या सहमित्रांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ गोळा झाले आणि नंतर लोणावळा ग्रामीण पोलिस दल व आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले.
रविवारी मावळ तालुक्यातील आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र मावळ आणि लोणावळा ग्रामीण पोलिस यांच्याकडून सदर तरुणाचा शोध घेण्यात आला. मात्र रविवारी त्याचा शोध न लागल्याने शोध मोहिम थांबवून आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध मोहिम सुरु करण्यात आली आणि दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.