पिंपरी (पुणे) : रोगी तरुणाला हजार रुपये भाड्याने घेत एका वृद्धेने बळजबरीने भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार काळेवाडी सिग्नलजवळ मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्याने हटकल्यानंतर संशयित महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून वाकड पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.एक महिला रोगी तरुणाला दोरी बांधून ओढत भीक मागायला लावत असल्याचे ‘स्माइल प्लस’ संस्थेचे योगेश मालखरे यांनी पाहिले. विचारपूस केली असता संबंधित महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित तरुणानेच आपबिती सांगितली.अनुप सिंग (३०, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे पीडित तरुणाचे नाव असून दुणुकाबाई युवराज काळे (७०, रा. अहमदनगर) हिने त्याला हजार रुपये भाड्याने घेतले होते. दुणुकाबाई हिने त्याला दिवसाला दीड हजार रुपयांचे भीक मागण्याचे लक्ष्य दिले होते. ते पूर्ण झाले नाही, तर त्याला रात्री उपाशी ठेवणे, सिगारेटचे चटके देणे, असे अत्याचार केले जात होते. याप्रकरणी अनुपचा जबाब नोंदवून दुणुकाबाईवरमुंबई भिक्षा प्रतिबंधक नियम कलम ११ नुसार गुन्हा नोंदविण्यातआला आहे.दुणुकाबाईची झडती घेतली असता, तिच्याकडे काही रोकड आणि व्हॉल्वो बसच्या स्लीपर कोचचे तिकीट मिळाले. पोलिसांना तिने एका वकिलाचे व्हिजिटिंग कार्ड देत, हा आमचा वकील असून याला फोन करा, असे सांगितले. या प्रकारामुळे त्यांचे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
भीक मागण्यासाठी तरुण भाड्याने, पिंपरीत रॅकेट, अहमदनगरमधील वृद्धेविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 1:03 AM