पिंपरी : पार्ट टाइम जॉब व त्यामधून अधिकचे उत्पन्न मिळवून देत असल्याचे सांगत विविध प्रकारचे टास्क दिले. त्यामधून १ कोटी २ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने घेत तरुणीची फसवणूक केली. ही घटना ३ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत देहूरोड येथे घडली. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात गुरूवारी (दि.२) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, ९५७१८६६८७६ या व दोन इतर टेलिग्राम आयडीधारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या घरी असताना संशयित आरोपींनी त्यांच्याशी ऑनलाइन माध्यमातून संपर्क केला. त्यांना टेलिग्रामवरून पार्ट टाइम काम व अधिकचे उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रीपेड टास्कची माहिती दिली. त्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल असे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी २ लाख ८३ हजार ८४८ रुपये जमा करून घेतले. मात्र, त्यानंतर ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.