पिंपरी : नोकरीचे आमिष दाखवून आठ ते दहा तरुणांकडून प्रत्येकी वीस हजार रुपये घेतले. ते मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्याचे सांगत तीन महिने त्यांच्याकडून इंटर्नशीपचे कामही करुन घेतले. त्यानंतर संबंधित कंपनीचालक गायब झाला. या फसवणूकप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर येथील मायक्रोइफोटेक या कंपनीत घडली. या प्रकरणी हर्षद सुभाष शेळके (वय २५, रा. त्रिमुर्ती चौक, कात्रज, मूळ-दुधोटी, ता. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रियम (पूर्ण नाव माहित नाही. सी ५४/४९ सेक्टर नं. ६२, नोएडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी हर्षद आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून नोकरीसाठी आरोपीच्या कंपनीत अर्ज केला. आरोपीने त्यांच्याकडून मुलाखतीसाठी प्रत्येकी २० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी मुलांना मुलाखतीत उत्तीर्ण झाल्याचे सांगत इंटर्नशिप करावी लागणार असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून तीन महिने इंटर्नशिपच्या नावाखाली काम करुन घेतल्यानंतर आरोपी गायब झाला. दरम्यान, हर्षद यांनी आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हिंजवडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 5:48 PM