पिंपरी : एमबीबीएससाठी ॲडमिशन घेऊन देतो, असे अमिष दाखवून आठ जणांकडून तब्बल दोन कोटी दोन लाख चार हजार ५०० रुपये घेतले. तसेच तुमच्या मुलाचे, पुतण्याचे नाव यादीमध्ये आहे, असे सांगून खोटी यादी दाखवत फसवणूक केली. हा प्रकार एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर याकालावधीत हिंजवडी येथे घडली.
या प्रकरणी नितीन शिवाजी ढवाण (वय ४१, जळोची, ता. बारामती) यांनी शनिवारी (दि.३०) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित सिद्धार्थ रावत उर्फ शुभम सिंग जयबहादूर सिंग, विजेंद्र वर्मा यांच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी हिंजवडीमध्ये आपले कार्यालय सुरु केले होते. त्यांनी एमबीबीएससाठी सांगलीतील प्रकाश पाटील मेडिकल कॉलेज, जळगावामधील उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, धुळेतील एसपीपीएम मेडिकल कॉलेज आणि पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी ॲडमिशन मिळवून देतो, असे अमिष दाखवले. त्यातून हनुमंत भोसले (रा. ठाणे) यांनी १७ लाख १५ हजार रुपये, बाळकृष्ण मोहन पिंगळे (रा. बारामती) यांनी २८ लाख ५० हजार, मेघना मलिक (रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी १३ लाख, दीपक यादव (रा. सोलापूर) यांनी १५ लाख, नवी मुंबईतील किशोर पाटील यांनी ३८ लाख, तर कैलास काळे यांनी ४० लाख ८० हजार, वर्धा येथील विनोद तेलंग यांनी २० लाख आणि फिर्यादी नितीन ढवणे यांनी २८ लाख ९ हजार ५०० रुपये संशयितांना दिले.
पैसे घेतल्यानंतर संशयितांनी कॉलेज ॲडमिशनच्या दोन यादी लागल्या आहेत. तिसऱ्या यादीत तुमच्या मुलांची नावे असतील, असे आश्वासन दिले. त्यांनी नाव असणारी खोटी यादीच आपल्या मोबाईलमध्ये दाखवली. मात्र, प्रत्यक्षात ॲडमिशन केले नाही. फिर्यादी यांनी संशयितांशी संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद लागला तसेच त्यांचे हिंजवडीमधील कार्यालय देखील बंद असल्याचे आढळून आले.