पिंपरी : सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २१ मे २०१६ ते ३० मार्च २०२५ या कालावधीमध्ये काळेवाडी येथे घडली.
वैशाली राॅन केदार (वय ३१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती रॉन पंडित केदार, सासू, सासरा पंडित अर्जुन केदार, नणंद, दीर राहुल पंडित केदार, रामदास दगडू साळवे आणि एक महिला (सर्व रा. काळेवाडी, पिंपरी-चिंचवड. मूळगाव वाण्याविहीर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ॲड. सुनीता राजू मोरे (३४, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २ एप्रिल) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ॲड. सुनीता राजू मोरे यांची बहीण वैशाली यांचा राॅन केदार याच्याशी २१ मे २०१६ रोजी विवाह झाला. त्यावेळी वैशाली या पती राॅन यांच्या मूळगावी राहत होत्या. पती राॅन हा पुण्यात नोकरी करत होता. दरम्यान, सासरी नांदत असताना वैशाली यांना संशयितांनी क्रूर वागणूक दिली. त्यांचा छळ केला. तुझे लग्न घरकामासाठी केले आहे. लग्नामध्ये तुझ्या घरच्यांनी आम्हाला हुंडा दिला नाही, माझ्या मुलासाठी श्रीमंत मुलगी आम्ही घेऊन येऊ त्यामुळे तुला आम्ही पुण्याला पाठवणार नाही, तू येथेच आमची घरातील कामे करायची, असे म्हणून सासू आणि नणंदेने त्रास दिला. दरम्यान, वैशाली या पुण्यात राहण्यासाठी आल्या. त्यानंतरही संशयितांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरूच ठेवला. त्याला कंटाळून वैशाली यांनी काळेवाडी येथील राहत्या घरी मुलाच्या झोक्याला असलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.