तळेगाव दाभाडे : मित्रांसमवेत वर्षाविहारासाठी आलेला एक तरूण कुंडमळा येथील इंद्रायणी नदीपात्रात वाहून गेला आहे. ही दुर्घटना मंगळवारी (दि. १८) सायंकाळी चारच्या सुमारास घडली. एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहेत.तरबेज शाहजान पटेल (वय ३०, रा. खराळवाडी, पिंपरी) असे पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरबेज आपल्या तीन मित्रांसोबत मंगळवारी सकाळी तळेगाव जवळील कुंडमळ्यात वर्षाविहारासाठी आला होता. देवदर्शनापूर्वी हातपाय धूत असताना तोल गेल्याने तो पाण्यात वाहून गेला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने त्याला काठावर येता आले नाही. आपला मित्र वाहून जात असल्याचे पाहून अन्य मित्रांनी आरडाओरडा केला.घटनेची माहिती मिळाली मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी सुरुवातीला नदीपात्राच्या परिसरात शोध घेतला. मात्र, तरबेजचा पत्ता न लागल्याने सुदुंबरे येथील एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि रात्र झाल्याने मंगळवारी तरबेजचा शोध घेता आला नाही. बुधवारी सकाळी शोधकार्य सुरू झाले, परंतु रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. कुंडमळा येथील रांजण खळगे आणि अन्य पर्यटनस्थळावर काही अतिउत्साही पर्यटक पोलिसांची नजर चुकवून वर्षाविहारासाठी येत आहेत.
मित्रांसमवेत वर्षाविहारासाठी आलेला तरूण इंद्रायणी नदीत गेला वाहून; तळेगावची घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:51 PM
देवदर्शनापूर्वी हातपाय धूत असताना तोल गेल्याने तो पाण्यात वाहून गेला..
ठळक मुद्देपर्यटनस्थळावर अतिउत्साही पर्यटक येतात पोलिसांची नजर चुकवून