तळेगाव दाभाडे : निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भीती वा़टू लागली आहे. इंदोरी येथील तरुणांनी चिमणी वाचविण्यासाठी कृत्रिम घरटी बनविली आहेत. २० मार्च हा जागतिक चिमणी दिवस असल्याने चिमणीसाठी अन्न-पाण्याची सोय आपल्या घरासमोर करा, असे आवाहन इंदोरी मावळ येथील पक्षीप्रेमी ऋषिकेश लोंढे, भूषण ढोरे, अजिंक्य येवले, तुषार दिवसे, हर्षद दोंदे, गणेश हिंगे, विनोद येवले, धर्मनाथ दिवसे, नितिन पवार, उमेश येवले, रोहिदास खैर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. जागतिक चिमणी दिवसानिमित्त चिमण्यांच्या निवाऱ्यासाठी सुमारे १०० कृत्रिम घरटे लावण्यात आले आहेत. इंदोरी तसेच कान्हेवाडी परिसरात हा उपक्रम पार पडला.घरे, रस्ते यावर चिमण्या दिसेनाशा झाल्या आहेत. पूर्वीच्या घरांची रचना चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी सोयीची होती. परंतु आता कॉँक्रिटची जंगले उभी झाली. माणसाची मनेही कोती झालीत. त्यामुळे चिमण्यांनी देखील काढता पाय घेतला, असे चित्र भारतातच नाही तर युरोप, आफ्रिका खंडातही चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे.(वार्ताहर)
चिऊसाठी धावली तरुणाई
By admin | Published: March 21, 2017 5:11 AM