लोकमत न्यूज नेटवर्कतळवडे : वेळ रात्री साडेसात ते आठची... तळवडे ते निगडी या मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ... एकापाठोपाठ एक वेगात जाणारी वाहने... जो तो मार्गक्रमण करत आपापले वाहन पुढे नेण्याच्या प्रयत्नात; पण चुकून रस्त्यावर आलेला नागराज रस्ता दुभाजकाच्या कडेला आपले प्राण संकटात असल्याची जाणीव झाल्याने कसाबसा जीव वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे तरुणांनी पाहिले.सदर नागाचा जीव वाचवण्यासाठी काही तरुण धावले आणि रस्त्यावरील रहदारी काही काळ का होईना थांबविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तरुणांनी विनंती करत चालकांना थांबण्याची विनंती केली. जणू काही ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यातच कोणीही सर्पमित्र जवळ नसल्यामुळे करायचे काय हा प्रश्न उभा राहिला? परंतु त्यातीलच काही धाडसी तरुणांनी काठ्या हातात घेतल्या. एक बारदानाची सोय करण्यात आली आणि ती एका हातात धरून दुसऱ्या हातातील काठीने नागाला बसदानात जाण्यासाठी ढकलण्याचा प्रयत्न केला. नागालाही स्वत:च्या बचावासाठी बारदान सोयीचे वाटले, आणि त्याने मागे पुढे करत सरळ बारदानात प्रवेश केला़ परंतु बारदानात नागाला ठेवणे सुरक्षित वाटत नसल्याने, तरुणांनी पुन्हा प्लॅस्टिकचे पोते आणून त्यात नागाला सोडले. तरुणांना मोठ्या शिताफीने स्वत:चा बचाव करत नागाचे प्राण वाचविण्यात यश आले. पकडलेल्या नागाला तरुणांनी निर्जन स्थळी सोडून दिले.या वेळी वाहतूककोंडी झाली होती. परंतु, ही वाहतूककोंडी झाली. संकटात सापडलेल्या एका मुक्या प्राण्याचा जीव वाचविण्यासाठी झाली असल्याने प्रवाशांनी तरुणांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.
युवकांनी दिले नागाला जीवदान
By admin | Published: July 05, 2017 3:17 AM