पिंपरी : महापालिकेच्या वतीने संभाजीनगर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय उभारले आहे. या प्राणी संग्रहालयाच्या कारभाराचा गेल्या काही वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. कधी मृत सापांचा खच पडलेला आढळून येतो.कधी किंग कोब्रा गायब होतो. तर कधी उद्यानांतच पार्ट्या केल्याचा प्रकार उघडकीस येतो. आता ७ मगरी गायब झाल्याचा, ४ मगरींचा मृत्यू झाल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाचे (सेंट्रल झू अॅथोरिटी) नियम धाब्यावर बसवून तिकिटांवर प्राण्यांचे प्रदर्शन करण्याचा उद्योग महापालिकेने सुरू ठेवला आहे. महापालिकेच्या संभाजीनगर येथील प्राणी संग्रहालय आणि सर्पोद्यानात अनेक गैरप्रकाराच्या घटना घडल्या आहेत. सर्पोद्यानाचे तत्कालीन संचालक अनिल खैरे यांच्या काळात काही महिन्यांसाठी किंग कोब्रा गायब झाला होता. किंग कोब्रा गायब झाल्याचे प्रकरण दहा वर्षांपूर्वी गाजले होते. त्यानंतर बदकांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर सर्पमित्रांनी पकडून आणलेले साप उद्यानात जमा केल्यानंतर साप ठेवलेल्या प्लॅस्टिक बरण्या तसेच बॅगा उघडण्याची तसदी उद्यानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. त्यामुळे एकदा तब्बल ३० साप आणि त्यानंतर पुन्हा घडलेल्या घटनेत २० साप मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले होते. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सापांचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आली होती. सर्पमित्रांनी ज्या सापांना जीवदान दिले, त्यांची देखभाल होईल, योग्य प्रकारे संवर्धन केले जाईल, अशी अपेक्षा असलेल्या ठिकाणी उद्यानात मृत सापांचे खच पडलेले नागरिकांना पाहावयास मिळाले. सर्पमित्रांनी पकडून आणलेल्या सापांचे काय करायचे? याबद्दलचे धोरणच स्पष्ट नव्हते. ज्यावेळी साप मृत झाल्याची घटना घडली. त्या वेळी सर्पमित्रांनी जखमी अवस्थेतील साप सर्पोद्यानात आणून सोडू नयेत, अशी भूमिका सर्पोद्यानाच्या व्यवस्थापनाने घेतली. दर तीन वर्षांनी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून प्राणी संग्रहालयाच्या परवानगीचे नूतनीकरण करावे लागते. पालिकेने २०१५ मध्ये परवान्याचे नूतनीकरण केले आहे. २०१८ मध्ये पुन्हा नूतनीकरण करावे लागणार आहे. छोट्या स्वरूपातील प्राणीसंग्रहालय अशी परवानगी देण्यात आलेली आहे. तत्कालीन अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन करून प्राणीसंग्रहालय पुनर्विकासाचा १५ कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. (प्रतिनिधी)
प्राणीसंग्रहालय कार भाराचा खेळखंडोबा
By admin | Published: March 20, 2017 4:25 AM