नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचं निवडणूक चिन्ह असलेल्या पंजाला पाच बोटं आहेत. त्याप्रमाणेच काँग्रेसच्या जाहीरमान्यातही पाच प्रमुख घोषणा असल्याचं यावेळी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी सांगितलं. न्याय योजना, रोजगार, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्य या पाच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली. त्यांनी बेरोजगारीच्या विषयावर भाष्य करत सत्तेत आल्यास वर्षभरात 22 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देऊ, असं मोठं आश्वासन राहुल यांनी दिलं.देशातील बेरोजगारीचा मुद्दादेखील महत्त्वाचा असल्याचं राहुल गांधी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना म्हणाले. 'मोदींनी 2 कोटी रोजगारांचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याचं काहीच झालं नाही. आम्ही 22 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देऊ. सध्या इतक्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. मोदी सरकारच्या काळात या 22 लाख जागा भरल्याच गेलेल्या नाहीत. काँग्रेस सत्तेत आल्यावर मार्च 2020 पर्यंत या जागा भरल्या जातील. 10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार दिला जाईल,' असं राहुल म्हणाले. सरकारच्या मेक इन इंडिया, स्टार्ट अपवरदेखील त्यांनी निशाणा साधला. स्वत:चा उद्योग सुरू करणाऱ्या तरुणांना सरकारकडून विशेष मदत देण्यात येईल, असंदेखील त्यांनी सांगितलं. 'एखाद्या तरुणालाउद्योग सुरू करायचा असल्यास त्याला सध्या विविध विभागांची परवानगी लागते. मात्र काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर तीन वर्षे कोणतीही परवानगी लागणार नाही. तरुणांनी रोजगार निर्माण करावा, आम्ही त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे उघडू,' अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय ज्या मनरेगाची मोदींनी खिल्ली उडवली, त्या मनरेगाच्या अंतर्गत 150 दिवस रोजगार देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.