अहमदनगर – केंद्रीय कॅबिनेट विस्तारानंतर महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांच्या नाराजीचं लोण आता बीडमधून अहमदनगर जिल्ह्यातही पसरलं आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चेने मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. परंतु मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत प्रीतम मुंडे यांच्या नावाला स्थान न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पकंजा मुंडे यांनी पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगितलं असलं तरी मुंडे समर्थकांमध्ये वेगळीच राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेगाव येथे मुंडे समर्थकांनी राजीनामा दिल्याने भाजपात खळबळ माजली आहे. गेल्या २-३ दिवसांपासून मुंडे समर्थकांच्या राजीनाम्याचं सत्र सुरू आहे. पाथर्डी-शेगावमधील पंचायत समितीच्या सभापती सुनील दौड, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, धनंजय बडे यांच्यासह २५ भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्ष नेतृत्वाकडे कार्यकर्त्यांच्या भावना पोहचवाव्यात यासाठी आम्ही राजीनामा देत आहोत असं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
यातच मंगळवारी पंकजा मुंडे यांनी मुंबईतील त्यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यात राजीनामा दिलेलं पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत बीडमधील ७७, अहमदनगर २५-३० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. बीडमधील तर सर्वच ११ तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. यातच पाथर्डी तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून लोकनेते गोपीनाथ मुंडे पाथर्डी तालुका विकास आघाडी स्थापन करूया असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा यांची दिल्लीत घेतली भेट
नाराज समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची येथे भेट घेतली. पंकजा मुंडे भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे दिल्लीत गेल्या होत्या. त्या केंद्रीय नेतृत्वापुढे प्रीतम मुंडेबद्दलची आपली बाजू मांडतील, असे म्हटले जात होते. तथापि, त्यांनी आधीच स्पष्ट केले होते की, बहिणीला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ती आणि तिचा परिवार नाराज नाही.
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आम्ही कधीही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य भागवत कराड यांचा समावेश झाल्यामुळेही मुंडे समर्थक नाराज आहेत, असे म्हटले जाते. पहिल्यांदा खासदार झालेले कराड यांना बळ दिल्यास मराठवाड्यात मुंडे यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकेल, अशा नजरेतून पाहिले जात आहे.