चंदिगड – कोरोना संकटाशी लढत असलेल्या पंजाबमध्ये राजकीय संकट उभं राहिलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबकाँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच प्रादेशिक राजकारणात आता केंद्रीय नेतृत्वानं लक्ष दिलं आहे. काँग्रेस हायकमांडनं पक्षाच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे.
पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदार आणि मंत्री काँग्रेसमधील ३ सदस्यीय समितीसमोर त्यांच्या समस्या मांडतील. काँग्रेसच्या किमान २४-२५ आमदार ज्यात प्रदेशाध्यक्ष सुनील झाखडं, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा यांचा समावेश आहे. ते सर्व दिल्लीत पोहचलेत. निवडणुकीत काँग्रेसनं दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यानं आता पक्षाच्याच आमदारांनी स्वपक्षीय सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
प्रत्येक आमदारांशी वैयक्तिक संवाद साधणार
केंद्रीय नेतृत्वाने बनवलेल्या ३ सदस्यीय समितीत हरिश रावत मुख्य असतील. त्याशिवाय मल्लिकार्जुन खरगे, जेपी अग्रवाल यांचाही समावेश आहे. सोमवारपासून पंजाबमधील काँग्रस आमदार, मंत्री यांच्या बैठका सुरू झाल्यात. सोमवारी चरणजीत सिंह चन्नी, सुखजिंदर सिंग रंधावा समितीसमोर म्हणणं मांडतील. त्यानंतर मंगळवारी नवज्योत सिंग सिद्धू, परगट सिंग समितीसमोर हजर होतील. कॅप्टन अमरिंदर यांचे समर्थक असलेले मनप्रीत बादल, साधु सिंग हेदेखील दिल्लीत आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे आठवड्याच्या सुरुवातीला पॅनलसमोर हजर होतील.
पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीपासून अंतर्गत गटबाजी असल्याच्या बातम्या समोर येत आहे. नवज्योत सिंग सिद्धू वारंवार कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात मोर्चा उघडत आहे. तर संघटनेतील अनेक नेते कॅप्टनच्या सरकारवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. अशावेळी जेव्हा राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे काँग्रेस हायकमांड प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत.
अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात वाद
नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्ष प्रभारी आशा सिंग यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी मॅडम सिद्धू लोकसभेच्या उमेदावारीसाठी योग्य वाटत नाहीत. दसऱ्या दिवशी झालेल्या ट्रेन दुर्घटनेच्या आधारावर माझे तिकीट कापले गेले, असा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता. तर माझी बायको कधी खोटं बोलत नाही. ती नैतिकतेने मजबूत आहे असं सांगत नवज्योत सिंग यांनी तिची पाठराखण केली होती.