‘हम दो, हमारे दो’ हेच मोदी यांचे सरकार; राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 03:52 AM2021-02-12T03:52:13+5:302021-02-12T07:08:41+5:30
तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.
नवी दिल्ली : पूर्वी हम दो, हमारे दो असा नारा होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो‘चे सरकार आहे. ते कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेत केली.
तुम्ही आपल्या भाषणात फक्त केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दलच मते मांडा, अशी सूचना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना वारंवार केली. पण त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधी यांनी नवे कृषी कायदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीकेची झोड उठविली.
राहुल गांधी यांच्या हम दो हमारे दो या उद्गारांवर केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी आव्हान दिले की, राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी व अंबानी यांच्या संदर्भात हम दो, हमारे दो असा उल्लेख केला आहे. हे उद्योगपती व मोदी सरकारबद्दल केलेले आरोप सिद्ध होतील, असे पुरावेही राहुल गांधी यांनी सादर करावेत.
राहुल गांधी म्हणाले की, नव्या कृषी कायद्यांमधील पहिला कायदा हा देशातील मंडईव्यवस्था उद्ध्वस्त करणारा आहे. शेतकऱ्यांकडून उद्योजक किंवा कंपन्या अमर्याद स्वरूपात शेतीमाल खरेदी करून त्याची हवा तितका काळ साठवणूक करू शकतील, अशी मुभा दुसऱ्या कृषी कायद्याद्वारे मिळाली आहे. शेतकऱ्यांना हक्काच्या गोष्टी कॉपोर्रेट कंपन्यांकडून मागण्यास तिसऱ्या कृषी कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांपुढे तीन पर्याय भूक, बेकारी, आत्महत्या
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांपुढे भूक, बेकारी, आत्महत्या हे तीनच पर्याय शिल्लक ठेवले आहेत. नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत.