बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या राजद-काँग्रेस आघाडीने मुसंडी मारलेली असताना अचानक एनडीएने कमबॅक करत जवळपास 130 जागांवर आघाडी मिळविली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार असल्याचे सांगत सर्वच पक्षांचे टेन्शन वाढविले आहे.
महत्वाचे म्हणजे सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांमध्ये अनेक उमेदवारांना 5,8, 32 ते 3000 मतांचे लीड मिळालेले आहे. मात्र, हे लीड कधीही तुटण्याची शक्यता असून सध्या सुरु असलेली बाजी कधीही पलटणार आहे.
सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भाजपाच्या आहेत. एनडीएसह राजदचे उमेदवार 5, 8, 32 अशा मतफरकाने आघाडीवर आहेत. हा फरक काही मतांचा असल्याने मतांच्या पॉकेटवर सारे गणित ठरणार आहे. एखाद्या उमेदवाराचे, पक्षाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणची ईव्हीएम मोजणीला आल्यास हे मताधिक्य पुन्हा खाली-वर होणार आहे. ही आकडेवारी दुपारी २ च्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर आहे.
दुपारी १ वाजताच्या आकडेवारीनुसार 166 जागांवरील मताधिक्य हे 5000 हून कमी होते. तर 123 जागांवरील पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवाराच्या मतांचा फरक हा 3000 मतांहूनही कमी होता. 80 जागांवर हा आकडा 2000 हून कमी होता. 49 जागांवर हा आकडा 1000, तर 20 जागांवर मिळालेले मताधिक्य हे 500 हूनही कमी होते. सात जागांवर तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आघाडी मिळालेली आहे. या जागा बिहारच्या निकालाचे रुपडेच पालटण्याची शक्यता आहे.
निकाल मध्यरात्रीबिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत, मात्र अद्यापही निकालांच्या आकड्यात काहीही होऊ शकते अशी स्थिती आहे. याचवेळी बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, यंदा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली आहे. यावेळी मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५ मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती पण यावेळी ५८ ठिकाणी मतदान केंद्रे होती असं डीईसी चंद्रभूषण यांनी सांगितले.