मुंबई – उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील घटनेवरुन देशभरात संताप व्यक्त होत आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर अनेकांनी योगी सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. मात्र हाथरस घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडली आहे.
गोरेगावच्या आरे कॉलनीत ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेवरुन मनसेने आक्रमक मागणी केली आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे म्हणाल्या की, माझी मुंबई पोलिसांना आग्रहाची विनंती आहे, या आरोपीला पोलिसांनी फक्त अर्ध्या तासासाठी आमच्या- मनसेच्या रणरागिणींच्या ताब्यात द्यावे. 'मनसे स्टाईलने त्या आरोपीची चौकशी' करून आम्ही त्याला पुन्हा पोलिसांकडे देऊ. बघूया, त्यानंतर एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
तर भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही गोरेगाव येथे घटनास्थळी भेट दिली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. लाज वाटली पाहिजे, रोज मोकाट हरामखोरकडनं महिला मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जाताहेत, महाराष्ट्रातल्या लेकीबाळी काय रस्त्यावर पडल्याहेत का? असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे.
नेमकं काय घडलं?
आरे कॉलनीत ६ वर्षीय चिमुरडीवर सोमवारी दुपारी बलात्काराची घटना घडली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक केलेला आरोपी हा मुलीच्या घरच्यांच्या परिचयातील होता. या आरोपीने मुलीसोबत घृणास्पद कृत्य केले.
हाथरस प्रकरणावरुन टीका करणाऱ्यांवर भाजपाने केला पलटवार
हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत प्रकरण सीबीआयकडे दिले, पण महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांत ज्या घटना घडल्या त्यांवर किती कारवाई झाली? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा पण आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पाहणार? महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केले आहे, हे ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारण्याचे धाडस दाखवावे. महाराष्ट्रात कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रूग्णांवर बलात्कार, विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत याकडे भाजपाने लक्ष वेधलं आहे.