नवी दिल्ली : भारतातील बहुतांश तरुण कर्मचाऱ्यांना ४ दिवसांचा कामकाजी आठवडा हवा आहे. यासंबंधी करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात १० पैकी ७ तरुण कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांच्या कामकाजी आठवड्याच्या बाजूने कौल दिला आहे.‘सायट्रिक्स सिस्टिम्स’ने केलेल्या ‘बॉर्न डिजिटल इफेक्ट’ सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार, भारतातील तरुण पिढी करिअरच्या बाबतीत सर्वाधिक ९४ टक्के प्राधान्य स्थैर्य आणि सुरक्षेला देते. पात्रता वृद्धी तसेच प्रशिक्षण अथवा कौशल्य वृद्धीला ९३ टक्के, तर उच्च दर्जाचे कार्यस्थळ यास ९२ टक्के प्राधान्य मिळाले आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ७६ टक्के कर्मचारी साथपश्चात काळात पूर्णवेळ कार्यालयात बसून काम करू इच्छित नाहीत. घरी बसून अथवा हायब्रिड कार्यपद्धतीला ते पसंती देत आहेत. ‘सायट्रिक्स’च्या शासकीय उपाध्यक्ष आणि मुख्य व्यक्ती अधिकारी डोना किमेल यांनी सांगितले की, ही तरुण पिढी आधीच्या पिढ्यांपासून पूर्णत: वेगळी आहे. कंपन्यांना यशस्वी व्हायचे असेल, तर या तरुणांची मूल्ये, करिअरविषयी महत्त्वाकांक्षा आणि कार्यशैली या बाबी समजून घ्याव्या लागतील. त्यांच्या विकासासाठी गुंतवणूक करावी लागेल. भारतातील ७६ टक्के बॉर्न डिजिटल कर्मचाऱ्यांना वाटते की, साथीनंतर कंपन्यांनी ५ ऐवजी ४ दिवसांचाच कामकाजी आठवडा करायला हवा. साथीमुळे बदललेल्या परिस्थितीत आठवड्यातील कामाचे दिवस कमी व्हायला हवेत, असे त्यांना वाटते. कंपनी निवडण्याच्या बाबतीत तीन घटकांची निवड करण्यास सांगितले, तेव्हा या तंत्रज्ञांनी स्वायत्तता व विश्वसनीय वातारण, नवता आणि शिकण्याची दिशा व वृद्धी यांना प्रत्येकी ९० टक्के प्राधान्य दिले.
nबाॅर्न डिजिटल ही संस्था मिलेनिअल्स (१९८१ ते १९९६ दरम्यान जन्मलेले) तसेच जनरेशन झेड (१९९७ नंतर जन्मलेले) यांच्यासाठी वापरली जाते. ही पिढी संपूर्ण डिजिटल जगात विकसित झाली असून, जगातील श्रमशक्तीत तिचा वाटा मोठा आहे.