बेरीज वजाबाकीमिलिंद कुलकर्णी
भाजप हा जेव्हा शहरी पक्ष म्हणून ओळखला जात होता, त्यावेळी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातून भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येत असत. प्रा. ना. स. फरांदे, प्रकाश जावडेकर, जयसिंगराव गायकवाड, चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या नेत्यांची कारकीर्द या मतदार संघातून झाली. ग्रामीण भागात पक्षाचा विस्तार होत असताना पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या या मतदार संघावरील पकड कमी होत गेली. स्पर्धक पक्ष आणि संघटनांनी या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याने भाजपचे वर्चस्व संपुष्टात आले. नाशिक पदवीधर मतदारसंघात २००९पासून कॉंग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी प्रस्थापित केलेले वर्चस्व भाजपला प्रत्येकवेळी नवीन उमेदवार देऊनही संपुष्टात आणता आलेले नाही. प्रा. सुुहास फरांदे, प्रसाद हिरे, डॉ. प्रशांत पाटील यांच्यासारखे उमेदवार अपयशी ठरले. भाजप तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात आहे. निवडणूक जाहीर होऊनही भाजपचा शोध संपलेला नाही. गिरीश महाजन यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे. ह्यसंकटमोचकह्ण ही त्यांची प्रतिमा या निवडणुकीत लाभदायी ठरते का? याविषयी उत्सुकता आहे.
भुजबळांना ह्यब्रह्मगिरीह्ण कसे आठवले ?छगन भुजबळ यांनी अचानक ब्रह्मगिरी पर्वताची पाहणी केली आणि उत्खनन विषयी चिंता व्यक्त केली. इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्याची मागणी देखील केली. विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांनी केलेली मागणी रास्त असली तरी ते स्वत: अडीच वर्षे पालकमंत्री होते. त्या काळात देखील उत्खनन हा मुद्दा चर्चेत होता. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी स्वत: नाशिकमध्ये येऊन जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली होती. मात्र त्या काळात काहीही झाले नाही. मग अचानक भुजबळ यांना आठवण येण्याचे कारण काय ? यामागे राजकीय कारण तर नाही ना ? २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. प्रशासन त्याच्या तयारीला लागले आहे. त्यामुळे ब्रह्मगिरी, गोदावरी, तपोवनातील व्यवस्था, बाह्य रिंगरोड यासारख्या महत्त्वाच्या विषयावर भुजबळ यांनी सर्वपक्षीयांनी एकत्र करुन केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करायला हवा. अनुभवी, जाणकार नेते म्हणून नाशिककरांची त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.
राऊत येण्याआधी सेनेला खिंडार का पडते ?सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह शिवसेना सोडून गेले, तेव्हा संजय राऊत यांनी या आमदारांची संभावना रेडा, गद्दार अशा शब्दात केली होती. बंडखोर आमदारांचा सर्वाधिक राग हा ठाकरे पिता पुत्रांपेक्षा राऊत यांच्यावर अधिक आहे. आता देखील राऊत हे मुख्यमंत्र्यांपासून आमदारापर्यंत सगळ्यांवर टीका करीत असतात. त्यांना केसरकर, सामंत, गुलाबराव पाटील यांच्यासारखे मंत्री, शिरसाट यांच्यासारखे आमदार प्रत्युत्तर देत असतात. पण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे, खा. हेमंत गोडसे हे न बोलता काम करीत असतात. उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते म्हणून राऊत नाशिकला येणार असले की, ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिंदे गटात प्रवेश घडवून आणतात. लागोपाठ दोनदा असे घडल्याने राऊत यांना डिवचण्याचा तर शिंदे गटाचा प्रयत्न नाही ना, अशी शंका येते. चिडलेले राऊत मग कालपर्यंत सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना ह्यकचरा ह्ण म्हणून संबोधतात, तेव्हा सभोवताली उपस्थित असलेले सैनिक देखील चमकतात. राऊत यांना हे लक्षात कधी येणार ?
भुसेंची एकीची हाक; हिरेंचा सवतासुभाराज्यातील शिंदे गट आणि भाजप सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत. सहामाही परीक्षा पास झालो, आता वार्षिक परीक्षेत मेरिटमध्ये यायचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दोन्ही पक्षांमध्ये असलेल्या कुरबुरींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी सुरू केल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर मालेगावात पालकमंत्री दादा भुसे व खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. जिल्हा व तालुका पातळीवर समन्वय समिती नेमून दोन्ही पक्षांना सामावून घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला. मात्र, भाजपमधील अद्वय हिरे व सुनील गायकवाड यांच्या गटाने या बैठकीकडे पाठ फिरवली. याउलट नार-पार पाणी योजनेची खिल्ली उडविणाऱ्या दादा भुसे यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते अद्वय हिरे यांनी करून खळबळ उडवली. हा सवतासुभा भाजपची चिंता वाढविणारा आहे.
अधिवेशनावरून राजकीय वादकोरोनामुळे दोन वर्षे नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन झाले नाही. यंदा दोन आठवड्यांचे का होईना झाले. पण या अधिवेशनातील सहभागावरून राजकीय वाद उद्भवल्याचे दिसून आले. विधिमंडळात नियमित कामकाजापेक्षा वादंग अधिक होत असून त्यात सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूच्या सदस्यांचा सहभाग असल्याने वैतागून सिन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे अधिवेशन अर्धवट सोडून निघून आले. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहीरराव यांच्याविषयीची तक्रार मांडण्याचा प्रयत्न देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी विधिमंडळात केला. अखेर मतदारसंघात येऊन त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा प्रश्न मांडला. भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनी पहिल्या आठवड्यात अधिवेशनाकडे पाठ फिरवली. खान्देश महोत्सव या त्यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाला त्यांनी महत्त्व दिले. पक्षनेतृत्वाची परवानगी घेऊन त्या अनुपस्थित राहिल्या तरी हा चर्चेचा विषय ठरला. विधान परिषदेचे आमदार डॉ. तांबे यांना याच अधिवेशनात निरोप देण्यात आला. ते पुन्हा एकदा भविष्य आजमावत आहेत.