Akhilesh Yadav Maha Vikas Aghadi: जागावाटपावरून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातच जोरदार खेचाखेची सुरू असतानाच मविआतील घटक पक्ष समाजवादी पार्टीने चार उमेदवार जाहीर करत स्पष्ट संदेश दिला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांनी शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) चार उमेदवारांची नावे जाहीर केली.
समाजवादी पक्षाला हव्यात १२ जागा
२८८ जागांसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत छोटे घटक पक्षही आहेत. यात समाजवादी पक्षाने १२ जागांची मागणी केली आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्येच जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला असताना अखिलेश यादवांनी चार उमेदवारांची घोषणा केली.
समाजवादी पक्षाचे ते चार उमेदवार कोण?
अखिलेश यादव यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून अबू आझमी, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रईस शेख, भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून रियाज आझमी आणि मालेगाव विधानसभा मतदारसंघातून शाने हिंद यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
अखिलेश यादव मालेगावात माध्यमांशी बोलताना असेही म्हणाले की, "महाविकास आघाडीत १२ जागांची समाजावादी पक्षाची मागणी योग्य आहे. समाजवादी पक्ष महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकेल."
महाविकास आघाडीला अप्रत्यक्षपणे मेसेज
महाविकास आघाडीत तिन्ही प्रमुख पक्ष जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहे. शेकाप, डावे पक्ष यांनी महाविकास आघाडीकडे जागा मागितल्या आहेत, पण त्यांची एक-दोन जागांवर बोळवण केली जाणार असल्याची चर्चा आहे. समाजवादी पक्षालाही जास्त जागा मिळण्याची शक्यता नाही. पण, अखिलेश यादव यांनी चार उमेदवार जाहीर करत अप्रत्यक्षपणे स्वबळावर लढण्याचा इशारा दिला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील चारही पक्षांनी जागांचा आग्रह धरला नव्हता. पण, आता विधानसभा निवडणुकीत छोटे घटक पक्ष आक्रमक झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यांचा फायदा झाला होता. या पक्षातील इच्छुकांनी स्वबळावर मैदानात उडी घेतल्यास मतविभाजन होऊन महाविकास आघाडीलाच दणका बसेल, असे सध्या बोलले जात आहे.