"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 06:15 PM2024-09-22T18:15:23+5:302024-09-22T18:18:27+5:30
Ajit Pawar Umesh Patil : मोहोळमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना नाव न घेता चांगलेच झापले.
Ajit Pawar : "मध्ये तर कोण पठ्ठ्या म्हणला, आताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला?", असे म्हणत अजित पवार यांनी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांना नाव न घेता फैलावर घेतले.
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा सोलापूर जिल्ह्यात आहे. मोहोळ येथे माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी उमेश पाटील यांचा नामोल्लेख न करता समाचार घेतला.
अजित पवार म्हणाले, "पहिल्यासारखं सोलापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त महायुतीचे आमदार निवडून आले पाहिजे. माढ्याला जाणार आहे, तिथेही सांगणार आहे. त्या संदर्भात जातीचा-पातीचा, नात्याचा-गोत्याचा विचार करू नका."
"कोण पठ्ठ्या म्हणला आत्ताचा दौरा मी रद्द केला"
"कोण कोण काय काय सांगतंय त्याचा उल्लेख मगाशी तटकरेंनी केला. मध्ये तर कोण पठ्ठ्या म्हणला, आत्ताचा दौरा मी रद्द केला. अरे तू कसा रद्द केला? अजित पवारने आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा आहे", असे म्हणत अजित पवारांनी उमेश पाटलांचे कान टोचले.
"पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे मी दौरा पुढे ढकलला होता. पण, ते कुत्र कसं बैलगाडीखाली चालत असतं आणि त्याला वाटत मी गाडी ओढतोय. आरं पुढची बैल गाडी ओढताहेत. तू काय करतोय, तू देवळातील घंटा हलवतो?", अशा शब्दात अजित पवारांनी सुनावले.
मी दौरा रद्द करायला सांगितलेच नाही -उमेश पाटील
दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर बोलताना उमेश पाटील म्हणाले की, "अजित पवारांचा दौरा रद्द करा म्हणून सांगितलेच नव्हते. या मोहोळ तालुक्याच्या अनगरकरांनी त्यांना असे सांगितले की, उमेश पाटलांनी दादाचा दौरा रद्द करायला लावला. मी कशाला दौरा रद्द करायला लावतोय. मी काही एवढा मोठा नेता नाहीये की, दादांचा दौरा रद्द करायला लावेन. माझ्या सांगण्यावरून दादा ऐकत असते, तर मी या आमदाराची उमेदवारीच रद्द करून टाकली असती."
उमेश पाटील - राजन पाटील वाद काय?
अजित पवारांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे राजन पाटील यांनी अनगर गावात अप्पर तहसील कार्यालय मंजूर करून घेतले. त्यानंतर मोहोळ येथील राजन पाटील विरोध गटाने याला विरोध केला. यात उमेश पाटीलही आहेत. अजित पवार दौऱ्यावर असतानाच मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी चांगले फैलावर घेतले.