Shiv Sena Dasara Melava: शिवसेनेतील फुटीनंतर मुंबई विजयादशमीला दोन दसरा मेळावे सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होत असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर होत आहे. या मेळाव्याची तयारी सुरू असून, शिंदेंच्या शिवसेनेने टीझरमधून पहिला वार ठाकरेंच्या शिवसेनेवर केला आहे.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा पुढेही कायम आहे. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकाच दिवशी दोन शिवसेना मेळावे होत आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर शिवाजी पार्क मैदानावरून दोन्ही शिवसेना आमने-सामने आल्या होत्या.
काँग्रेसच्या पंजाला बांधला वाघ; व्यंगचित्राचा वापर करून उद्धव सेनेवर जोरदार टीका
"मराठी आपला श्वास,हिंदुत्व आपला प्राणचलो आझाद मैदान... वाजत गाजत या, गुलाल उधळत या"
असे म्हणत शिवसेनेने एक टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा दिसतो. त्यानंतर शिवसेना नावाचा वाघ दिसतोय. वाघाच्या गळ्यात पट्टा असून, तो पट्टा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या पंजाला बांधला आहे, असे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे धनुष्यबाण घेऊन येतात आणि तो पट्टा तोडतात. नंतर शिवसेना नावाचा वाघ त्यांना मिठी मारतो.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिंदे सेनेचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. शिवसेनेचा वाघ उद्धव सेनेच्या काळात बांधला गेला होता, त्याला एकनाथ शिंदेनी सोडवला अशा थीमलाईनवर हा टिझर बनवला असून शिंदे सेनेकडून पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात हिंदुत्व हाच प्रमुख मुद्दा असणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
सलग दुसऱ्या वर्षी आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आली होती. पण, कोर्टाने ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला होता.
त्यानंतर आझाद मैदानात शिवसेनेचा मेळावा झाला होता. यावर्षीही आझाद मैदानातच मेळावा होणार आहे. बीकेसी मैदानात मेळावा आयोजित केल्याने वाहतूक कोडी उद्भवते, त्यामुळे दसरा मेळावा आझाद मैदानात होत आहे.