विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 04:50 PM2024-09-11T16:50:33+5:302024-09-11T16:53:01+5:30
AAP Haryana Assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेल्या आम आदमी पार्टीने चौथी यादी जाहीर केली असून, २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
Haryana Assembly election 2024 : जागावाटपावरून काँग्रेससोबतची आघाडी बिघडल्यानंतर आम आदमी पार्टीने 'एकला चलो'चा नारा दिला. हरियाणा विधानसभेच्या सगळ्या जागांवर आपकडून उमेदवार दिले जाणार असून, चौथी यादी पक्षाने बुधवारी जाहीर केली. चौथ्या यादीत २१ उमेदवारांच्या नावाचा समावेश असून, काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेल्या विनेश फोगाट यांच्याविरोधात आपने उमेदवार जाहीर केला आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपने आतापर्यंत ६१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
नायब सिंह सैनीविरोधात आपचा उमेदवार कोण?
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना यावेळी भाजपने लाडवा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून आपने जोगा सिंह यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने या मतदारसंघात मेवा सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
विनेश फोगाट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या फोगाट यांच्याविरोधात भाजपने कॅप्टन योगेश बैरागी यांना उमेदवारी दिली आहे. आपने या मतदारसंघातून WWE कुस्तीपटू कविता दलाल यांना मैदानात उतरवले आहे.
गुरुग्राम विधानसभा मतदारसंघातून आपने निशांत आनंद यांना उमेदवारी दिली आहे. नरेंद्र उकलाना यांना उकलानामधून, राजीव पाली यांना नारनौदमधून, राजेंदर सोरखी यांना हान्सीमधून, संजय सतरोदिया यांना हिसारमधून, तर हॅप्पी लोचाब यांना बादली मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
काँग्रेस-आप आघाडी का झाली नाही?
हरियाणा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याची तयारी काँग्रेस-आपची तयारी होती. पण, जागावाटपावरून खेळ बिघडला. आम आदमी पार्टीने जास्त जागांची मागणी केली. काँग्रेसच्या काही जागांवरही आपने दावा केला होता, असे सूत्रांनी सांगितले. आपने २० पेक्षा जास्त जागा मागितल्या. त्याला काँग्रेसमधून विरोध झाला आणि आघाडीची चर्चा फिस्कटली, असे सूत्रांनी सांगितले.