लखनऊ : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. रविवारी संजय सिंह यांनी योगी सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी लखनऊमधील आम आदमी पार्टीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले असल्याचा आरोप केला आहे.
संजय सिंह म्हणाले, "योगीजी आम आदमी पार्टीचे कार्यालय बंद करू शकतात, परंतु सत्याचा आवाज थांबवू शकत नाहीत. तुमच्या दडपशाहीविरूद्ध बोलत आहे आणि बोलत राहीन. बालिशपणाचे खेळ थांबवा, मी लखनऊमध्ये आहे, अटक करा." दरम्यान, आम आदमी पार्टीचे ज्या ठिकाणी कार्यालय आहे, त्याचे रेंट अॅग्रीमेंट नसल्याचे पोलिसांच्या सूत्रांकडून समजते.
योगी सरकारच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशातील पाच जिल्ह्यांत एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच, तुमच्याकडून गुन्हे, खून आणि बलात्कार यांसारख्या घटना थांबवता येत नाहीत आणि तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता काय? योगीजी तुम्हाला हुकूमशाही आणि दांडक्याने उत्तर प्रदेश चालवायचा आहे का? असे सवाल संजय सिंह यांनी केले आहेत.
याचबरोबर, संजय सिंह म्हणाले, "मी योगी सरकारला राज्यातील सर्व 1700 पोलीस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगेन, तरीही मला भीती वाटत नाही. बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था, महाग वीज आणि लोकांवर होणारा अन्याय असे मुद्दे सतत पुढे आणणार आहे. गरज भासल्यास आम्ही रस्त्यावर कार्यालय उघडू. आज ब्राह्मण समाजातील लोक चिंतित आहेत आणि त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. काल ओम प्रकाश राजभर यांनीही आमच्याशी चर्चा केली. बरेच लोक त्यांच्यासोबत आहेत."
याशिवाय, संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ जारी केला आहे. "सध्या मी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात आहे. गेल्या काही दिवसांपासून मी सतत योगी सरकारविरूद्ध सत्य बोलण्याचे धाडस दाखवत आहे. त्यांच्याविरोधात सतत आवाज उठवत आहे, त्यामुळे त्यांनी घरमालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या पार्टीचे कार्यालय बंद केले," असे यामध्ये म्हटले आहे.