नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोना संकट काळात योग हा आशेचा किरण असल्याचं म्हटलं. यासोबतच भारतानं जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) मिळून तयार केलेल्या M-Yoga App चं मोदींनी लाँचिंग केलं. भारतात ठिकठिकाणी कोरोनाचे नियम पाळत योग कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी योगावर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर योगगुरू रामदेवबाबा यांनी उत्तर दिले आहे. सिंघवी यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी योगा संदर्भात ओम आणि अल्लाहचा उल्लेख केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "ॐ चा जप केल्याने योग अधिक शक्तिशाली होत नाही आणि अल्लाह म्हटल्याने योगाची शक्ती कमी होणार नाही" असं म्हटलं आहे. सिंघवी यांच्या या ट्विटवर रामदेवबाबा यांनी "ईश्वर-अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान". अल्लाह, देव, खुदा सर्व एक आहेत, तर ॐ बोलण्यात काय हरकत आहे. परंतु आम्ही कोणालाही खुदा बोलण्यास मनाई करत नाही. या सर्वांनीही योग केले पाहिजेत, तर त्या सर्वांना एकच देव दिसेल असं म्हटलं आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही अभिषेक मनु सिंघवी यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते अशा प्रसंगी राजकारण का करतात आणि अशी विधाने का करतात हे मला माहीत नाही. लसीकरण आणि योग हे दोन्ही कोरोनाविरूद्धच्या लढ्यात संजीवनी आहे. संपूर्ण जगात योगामुळे आपल्या देशाची आज एक वेगळी ओळख बनली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. M-Yoga App च्या माध्यमातून जगभरातील लोकांना वेगवेगळ्या भाषेत योगा शिकता येणार आहे. "जगाला आता M-Yoga App ची ताकद मिळणार आहे. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील. भारताने संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सोबत मिळून एक महत्वाचं पाऊल उचललं आहे", असं मोदींनी यावेळी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाँच केलं M-Yoga App; जगाला मिळणार योगाचे धडे
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, योगाची माहिती फ्रेंच, इंग्रजी, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. अॅप पूर्णपणे सुरक्षित असून युझरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. १२ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात. "जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढले आहे. पूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही," असे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.