आग्रा : आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर ४८ तासांची प्रचार असल्याने त्यांचे भाचे आकाश आनंद यांना ‘बसप’ने केंद्रस्थानी आणून प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.बसपचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्र, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजितसिंग व आकाश आनंद यांनी चार मतदारसंघांत एकत्रित प्रचार केला. सपा-बसपा-रालोद आघाडीचा विजय हेच निवडणूक आयोगाच्या मुस्कटदाबी करणाऱ्या आदेशाला योग्य उत्तर असेल आणि प्रचारबंदीचा आदेश दलितविरोधी आणि घटनाबाह्य असल्याचे मिश्रा म्हणाले.बसपचे पश्चिम उत्तर प्रदेश समन्वयक नरेश गौतम यांनी आकाश आनंद यांना मायावती यांचे उत्तराधिकारी म्हणून पुढे आणल्याबद्दल समाधान व्यक्त केले. निवडणूक आयोगाने मायावती यांचे भाषण संपूर्ण जाणून घेतले नाही. त्यांनी त्या भाषणात जात-धर्माच्या आधारे मतविभागणी होऊ देऊ नका, असे आवाहन केले होते. पण आयोगाने भाषणातील नगण्य भागावर लक्ष केंद्रित केले, असा आरोप करून मिश्र म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत, हे निवडणूक आयोगाला दिसत नाही.पुलवामातील अतिरेकी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे, असे काश्मीरचे राज्यपाल म्हणाले असताना, अपयशाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मोदी शहिदांच्या नावे नक्राश्रू ढाळत आहेत,अशी टीकाही त्यांनी केली. (वृत्तसंस्था)
मायावतींच्या अनुपस्थितीत भाचा आकाश आनंद प्रचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 4:23 AM