मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीच्या घडामोडींना वेग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 10:34 PM2020-12-03T22:34:45+5:302020-12-03T22:35:16+5:30

Mumbai Congress President : माजी खासदार एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Accelerate the process of appointment of Mumbai Congress President! | मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीच्या घडामोडींना वेग!

मुंबई काँग्रेस अध्यक्ष नियुक्तीच्या घडामोडींना वेग!

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. अमरजीत सिंग मनहास यांच्यासह कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजित सप्रा, मधू चव्हाण यांची नावे मुंबई अध्यक्षपदासाठी  चर्चेत आहेत. 

- मनोहर कुंभेजकर

मुंबई - गेल्या दीड वर्षापासून रखडलेली मुंबईकाँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची घोषणा लवकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी खासदार एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर गेली 40 वर्षे काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले डॉ. अमरजीत सिंग मनहास यांच्यासह कामगार नेते भाई जगताप, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजित सप्रा, मधू चव्हाण यांची नावे मुंबई अध्यक्षपदासाठी  चर्चेत आहेत. 

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर मुंबईत आले होते. मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड, आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची रणनीती आणि मुंबईत काँग्रेस पक्ष कसा मजबूत करण्यासंदर्भात एच. के. पाटील यांनी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. 

गेल्या ऑक्टोबर महिन्यात तसेच दिवाळीनंतर आणि आता एच. के. पाटील यांनी मुंबईचा दौरा केला आहे. या तीन राऊंडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मुंबईतील काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान आमदार, विद्यमान मंत्री, विविध सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आता पूर्ण झाली असून आपला अहवाल ते काँग्रेस पक्ष श्रेष्टींकडे ठेवतील. त्यामुळे लवकरच मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड घोषित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या झालेल्या भेटीदरम्यान अनेक मान्यवरांनी डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते.

मुंबई पालिकेची निवडणूक स्वबळावर लढा
आगामी पालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष श्रेष्टींच घेतील, असे सांगण्यात आले. तसेच, यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड लवकर जाहीर करा, अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. याशिवाय, येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. प्रभागांचे आरक्षण निश्चित होईल. आचारसंहिता लागू होईल. नवीन अध्यक्षांना काम करायला वेळ मिळणार नाही. त्यामुळे आता त्वरित निर्णय घ्यावा, असे निवेदन देखिल शिष्टमंडळाने एच. के.  पाटील यांना दिल्याचे समजते.
 

Web Title: Accelerate the process of appointment of Mumbai Congress President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.