मुंबई : स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांची समाजाप्रती, देशाप्रती जी समर्पणाची भावना होती, तिच्यामुळेच आज ‘लोकमत’ खऱ्या अर्थाने लोकांचे मत बनले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी काढले.
सहारा स्टार येथे ‘लोकमत ट्रेंड सेटर्स पुरस्कार सोहळ्या’त राज्यपाल बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, उद्योजिका उषा काकडे, दिग्दर्शक नागनाथ मंजुळे, हिरे व्यापारी किरीट भन्साळी आणि लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘ट्रेंड सेंटर्स काॅफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांतील ट्रेंड सेटर्सना सन्मानित करण्यात आले.
एका ध्येयाने, देशासाठी समर्पित भावनेने काम सुरू केल्यास ती कामे मोठी होतात. स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांनी जेव्हा ‘लोकमत’ सुरू केले तेव्हा मी ‘लोकमत’ सुरू करेन, माझी मुले तो नंबर एकचा बनवतील, असा त्यांचा विचार नव्हता. त्यांच्या डोळ्यांसमोर तर केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा विचार होता. त्यासाठी बलिदानाची त्यांची तयारी होती. त्यांच्यासह अनेकांनी त्यासाठी त्याग केला आहे. बलिदान दिले. त्यांची ही प्रेरणा, समाज-देशाप्रतीची समर्पणाची भावना महत्त्वाची होती. त्यामुळे आज देश स्वतंत्र आहेच; ‘लोकमत’सुद्धा खऱ्या अर्थाने ‘लोकांचे मत’ बनल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी ‘लोकमत’च्या बातमीदारीचे विशेष कौतुक केले. ‘लोकमत’ योग्य आणि अचूक बातम्या देतो. आक्रस्ताळ्या बातम्या देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या गावी मी एक छोटी मुलाखत दिली. त्याचे विपर्यस्त वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले. वाहिन्यांनी ते दिवसभर चालविले. ‘लोकमत’ने मात्र जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले. मी ते ट्विटही केले होते. माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात एखादी छोटी बात किती मोठी बातमी बनते, याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला. आज छोटी बातमी मोठी करून लावण्याचा ट्रेंड; पण ‘लोकमत’ मात्र जे योग्य आहे तेच देण्याची आपली परंपरा जपत आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले - जयंत पाटील‘लोकमत’ योग्य आणि अचूक बातम्या देतो. आक्रस्ताळ्या बातम्या देत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या गावी मी एक छोटी मुलाखत दिली. त्याचे विपर्यस्त वृत्त काही वृत्तपत्रांनी दिले. वाहिन्यांनी ते दिवसभर चालविले. ‘लोकमत’ने मात्र जे घडले त्याचे अचूक वार्तांकन केले. मी ते ट्विटही केले होते. माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात एखादी छोटी बात किती मोठी बातमी बनते, याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला, असे या वेळी जयंत पाटील म्हणाले.