प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार : आचार्य प्रमोद कृष्णम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 04:09 PM2021-02-14T16:09:18+5:302021-02-14T16:10:53+5:30
आचार्य प्रमोद कृष्णम यांनी नव्या वादाला फोडलं तोंड
काँग्रेसच्या तिकिटावर संभळमधून लोकसभा निवडणूक लढलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियंका गांधी या दुर्गा मातेचा अवतार असल्याचं म्हटलं. तसंच त्यांच्याच हातून भाजपचा वध होणार असल्याचं वक्तव्य करत नव्या वादालाही तोंड फोडलं. आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी प्रियंका गांधी या सर्वात मोठ्या हिंदू असल्याचं म्हटलं. तसंच त्या दुर्गा मातेचा अवतार असून मंदिरात दर्शन करणं, प्रायागमध्ये स्नान करणं, हातांमध्ये रुद्राक्ष घालणं या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी असल्याचं त्यांनी नमूद केलं. भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार असल्याचंही ते म्हणाले.
आचार्य प्रमोद कृष्णम हे प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून लोकसभेची निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. "ज्या प्रकारे प्रियंका गांधी या शाकुंभरी देवीचा आशीर्वाद घेत आहेत, संगममध्ये स्नान करत आहेत, त्यांच्या या मोहिमेमुळे भाजपची हवा गेली आहे. भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे," असंही ते व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
प्रियंका गांधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशात काँग्रेसला संजिवनी देण्याच्या महाअभियानात व्यस्त आहेत. उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत प्रियंका गांधी स्वतःच काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत. यावेळी त्या योगी आदित्यनाथांना थेट टक्कर देतील असं म्हटलं जात आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या शेतकरी रॅलीत सहभाग घेण्याबरोबर त्या पक्षाला 'राजकीय भोवऱ्यातून' बाहेर काढण्यासाठी प्रयागराजच्या संगमापर्यंतही पोहोचल्या. तेथे तीन डुबक्या मारून त्यांनी काँग्रेसची नाव तिराला लावण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्वाचे कार्ड खेळायलाही सुरुवात केली आहे.
जागरण डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंका गांधी यांना काँग्रेसनं उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनविण्याचं ठरविलं आहे. प्रियंका यांनी राज्याच्या प्रभारी पदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांचे प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे. तसंच त्या सरकारशी सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते सांगत आहेत, की प्रियंका गांधी वाड्रा या विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार आहेत. यासंदर्बात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी आणि सामान्य नेता म्हणून आपली प्रतीमा निर्माण करण्याची प्रियंका यांची इच्छा आहे. संगमात स्वतःच नावेची धुरा सांभाळणे आणि काही दिवसांपूर्वी रामपूरच्या रस्त्यावर स्वतःच गाडीचा आरसा पुसणे याचाच एक भाग असल्याचे म्हटलं जात आहे.