नवी दिल्ली – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर बॉलिवूडमधील ड्रग्सचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अनेक बॉलिवूड सेलेब्रिटींची नावं यातून समोर येणार असल्याचा दावा केला जात आहे. बॉलिवूड आणि ड्रग्स हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनातही गाजत आहे. भाजपा खासदार रवी किशन यांनी ड्रग्सचा मुद्दा लोकसभेत मांडल्यानंतर खासदार जया बच्चन यांनी बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असं सांगत त्यांच्यावर पलटवार केला.
अभिनेत्री कंगना राणौतनं बॉलिवूडमधील ड्रग्सचा मुद्दा प्रखरतेने समोर आणला. त्यावर जया बच्चन यांनी काही जण ज्या ताटात जेवतात त्यालाच छिद्र पाडतात, हे चुकीचं आहे असं सांगत कंगनावर पलटवार केला. तर केंद्र सरकारने बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेट संपवावं, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भाजपा खासदार रवी किशन यांनी केली होती. त्यावर आता अभिनेत्री जया प्रदा यांनी रवी किशन, कंगना राणौतला पाठिंबा देत जया बच्चन यांना थेट आव्हानाचं दिलं आहे.
याबाबत जया प्रदा म्हणाल्या की, जया बच्चन यांनी जे विधान केले ते योग्य नाही. त्यांनी स्वत:च्या घरातूनच याविरोधात आवाज उचलत मी युवकांना सांभाळेन म्हटलं पाहिजे. बच्चन कुटुंब जे बोलतं ते जग ऐकण्यासाठी तयार असतं. त्यामुळे माझं बच्चन कुटुंबाला आव्हान आहे तुम्ही या ड्रग्स माफिया आणि ड्रग्स एडिक्टेंड युवकांना सांभाळू शकता का? ड्रग्स प्रकरणावरुन जया बच्चन राजकारण करत आहे असाही आरोप त्यांनी केला.
तसेच जया बच्चन यांच्या भावनांचा सन्मान करते, परंतु त्यांच्या भावनांमध्ये फक्त राजकारण दिसते. कारण अमर सिंह यांनी बच्चन कुटुंबीयांना संकटकाळी मदत केली होती. परंतु जेव्हा अमर सिंह जीवन आणि मृत्युच्या दारात संघर्ष करत होते तेव्हा जया बच्चन यांच्या भावना त्यावेळी दिसल्या नाहीत अशा शब्दात जया प्रदा यांनी बच्चन कुटुंबीयांवर आरोप केला आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सचा वापर समोर आला आहे. पंजाबपासून नेपाळपर्यंत ड्रग्स तस्करी होत आहे. देशाची युवा पिढी बर्बाद होतेय हे दु:खाचं आहे. ड्रग्सचा वापर फिल्म इंडस्ट्रीमध्ये असो वा समाजाच्या कोणत्याही वर्गात त्याला रोखणं गरजेचे आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक जण ड्रग्स घेतोच असं नाही. पण बॉलिवूडचा विनाश होण्यापासून वाचवलं पाहिजे. सरकारने ड्रग्स रोखण्यासाठी पावलं उचलावीत. या मुद्द्यावर कोणीही राजकारण करु नये असंही जया प्रदा म्हणाल्या आहेत.
रवी किशन यांनी लोकसभेत मांडला मुद्दा
सोमवारी सुरू झालेल्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी खासदार रवी किशन यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला, रवी किशन म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीत ड्रग्सचं व्यसन बऱ्याच प्रमाणात आहे. बरेच लोक पकडले गेले आहेत. एनसीबी खूप चांगले काम करत आहे. केंद्र सरकारने यावर कडक कारवाई करावी, दोषींना लवकरात लवकर अटक करुन त्यांना शिक्षा करावी जेणेकरून शेजारील देशांचे षडयंत्र संपुष्टात येऊ शकेल असं आवाहन त्यांनी केलं होतं.
रवी किशन यांच्या विधानावर जया बच्चन यांचा आक्षेप
रवी किशन यांच्या विधानानंतर जया बच्चन म्हणाल्या होत्या की, ' आमच्या एका खासदाराने लोकसभेत बॉलिवूडच्या विरोधात वक्तव्य केले. हे लाजीरवाणे आहे. मी कोणाचे नाव घेत नाही. तो स्वत: इंडस्ट्री मधून आला आहे. ज्या ताटात जेवायचं त्यालाच छिद्र पाडायचं ही एक चुकीची गोष्ट आहे. इंडस्ट्रीला सरकारच्या संरक्षण आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे. बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला होता.
बॉलिवूडच्या समर्थनार्थ 'ड्रीमगर्ल' सरसावली
फक्त बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच ड्रग्सचा वापर होतो हे कसं बोलता? जगात अनेक क्षेत्र आहेत ज्याठिकाणी ड्रग्स वापरलं जातं. बॉलिवूडमध्ये कोणी ड्रग्सचा वापर करत असेल याचा अर्थ संपूर्ण इंडस्ट्री खराब आहे असं होत नाही. ज्यारितीने लोक बॉलिवूडला निशाणा बनवत आहेत ते चुकीचं आहे, योग्य नाही असं अभिनेत्री हेमा मालिनीने म्हटलं होतं.
जया बच्चन यांच्यावर कंगना राणौतचा निशाणा
जया बच्चन यांनी संसदेत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये कंगनाने म्हटलं आहे की, ‘जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने आम्हाला कोणती थाळी दिली? एक थाळी मिळाली होती ज्यात दोन मिनिटांचे रोल, आयटम साँग आणि एक रोमँटिक सीन असायचा. ते सुद्धा अभिनेत्यासोबत शय्या केल्यानंतर. या इंडस्ट्रीला मी फेमिनिझम शिकवली. देशभक्ती आणि महिला केंद्रित चित्रपटांनी मी ती थाळी सजवली आहे. ही माझी स्वत:ची थाळी आहे जयाजी, तुमची नाही!’ कंगनाच्या या ट्विटनंतर आरोप-प्रत्यारोपांची राळ उठल्यानं बच्चन कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.