राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 09:02 PM2019-08-01T21:02:19+5:302019-08-01T21:04:59+5:30
सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणे : सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुळात कोल्हे हेदेखील यापूर्वी शिवसेनेत होते. त्यामुळे हा लढा आजी विरोधात माजी शिवसैनिक असाही असणार आहे. दुसरे साम्य म्हणजे हे दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत असून दोघांनीही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा ऐतिहासिक भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, तर बांदेकर गेली अनेक वर्ष काम एका कार्यक्रमात सूत्रधाराची भूमिका निभावत मनामनात पोचले आहेत. त्यामुळे दोघेही आपले राजकीय आणि स्वतःच्या प्रतिमेचे कसब पणाला लावून मैदानात उतरतील यात शंका नाही.
राजकीय युद्ध तापायला सुरुवात झाली असताना कोणताही राजकीय पक्ष कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून कोल्हे किल्ले शिवनेरीपासून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेद्वारे संवाद साधणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रेचे नियोजन केले आहे. मात्र त्यातही बांदेकर यांची महिला वर्गामध्ये असणारी लोकप्रियता लक्षात घेत त्यांचा 'माऊली संवाद' हा खास उपक्रम आयोजित केला जाणार आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्या ग्रामीण भागातील महिलाही यातून शिवसेनेकडे आकर्षित होऊ शकतात. कोल्हे यांची क्रेझ तरुणांमध्ये आहेच पण त्यांनाही आता महिला वर्गाच्या मतांवर फोकस करावा लागेल. अर्थात दोघांकरिता हे आव्हानच असून त्यांना प्रत्यक्ष मतपेटीतून कसा प्रतिसाद मिळतो हे बघावे लागणार आहे. पण सध्या तरी मूळ अभिनेते असलेले हे नेते एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत असे चित्र आहे.