अधीर रंजन चौधरींनी मिटवले ममतांसोबतचे मतभेद, भाजपला हरवण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:01 AM2021-05-25T06:01:47+5:302021-05-25T06:03:01+5:30
Adhir Ranjan Chowdhury: ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत काँग्रेसने काम करायला मला कोणताही आक्षेप नाही.
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे.
‘लोकमत’शी सोमवारी बोलताना चौधरी म्हणाले की, “ ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत काँग्रेसने काम करायला मला कोणताही आक्षेप नाही.” चौधरी हे पक्षाचे लोकसभेतील नेते आणि काँग्रेस कार्यकारिणी समितीचे सदस्यही आहेत. ममता बॅनर्जी यांचे टीकाकार अशीही त्यांची प्रतिमा आहे.
ते म्हणाले,“ गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी बॅनर्जी यांचा पक्ष आणि प्रदेश काँग्रेस एकत्र येत असतील तर माझा त्यालाही विरोध नाही.” गुजरातमध्ये गेले दोन दशके पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्ताधारी भाजपचे नेते राहिले आहेत. गुजरात काँग्रेसमध्ये एक गट तृणमूल काँग्रेसशी युती करण्याचा आग्रह धरत आहे याकडे चौधरी यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,“ त्याबद्दल मला माहिती नाही. पण माझा काही त्याला आक्षेप नाही. तथापि, या विषयावर पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घ्यायचा आहे.” भाजपला जे पक्ष वैचारिक पातळीवर विरोध करतात ते काँग्रेसचे मित्र होऊ शकतात. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टालिन, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, हे नेते केंद्र सरकारच्या काही विशिष्ट धोरणांच्या विरोधात एकत्र आले आहेत.
आक्रमक आणि विश्वासार्ह चेहरा हवा
- महत्त्वाच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत केल्यानंतर ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याजवळ आधीच गेल्या आहेत. ताज्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात काँग्रेस-माकपने उमेदवार उभे केले होते.
-गुजरातमध्ये भाजपशी दोन हात करण्याबाबत काँग्रेस खरोखर गंभीर असेल तर त्यांच्याकडे आक्रमक आणि विश्वासार्ह चेहरा त्यासाठी हवा. तरच भाजपच्या डावपेचांना व्यवस्थित तोंड देता येईल अन्यथा, गुजरात काँग्रेसमध्ये फूट पडू शकेल, अशी अंतर्गत माहितगारांना भीती आहे.