- यदु जोशीमुंबई : युवासेनेचे अध्यक्ष व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचार गांभीर्याने सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अर्थात त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन विद्यमान खासदार आहेत. ही जागा आदित्य यांच्यासाठी अधिक सुरक्षित असल्याचे मानले जाते. शिवसेनेने आदित्य यांच्यासाठी मुंबई उत्तर-मध्यची जागा मागितली तर त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लढावे, असे भाजपाकडून सुचविले जाऊ शकते. उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर विद्यमान खासदार आहेत. निवडणुकीच्या राजकारणापासून मी स्वत:ला कधीही दूर ठेवलेले नाही. गरज असेल तेव्हा मी लढेनही. लोकप्रतिनिधी म्हणून मोठे काम करता येऊ शकते. माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वा माझे वडील उद्धव ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढविली नाही पण, त्यांनी कुटुंबातील इतरांवरते मत कधीही लादलेले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. आदित्य यांनी आजवर कोणतीही राजकीय निवडणूक लढविली नसली तरी, मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनच्या अध्यक्षपदी ते निवडून आले आहेत.शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अनिल परब यांनी आदित्य ठाकरे निवडणूक लढविणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. दुसरीकडे, मावळमधील जागा शिवसेनेकडे असून तेथे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. राष्ट्रवादीने तेथे पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर केल्याने ही जागा युतीमध्ये आम्हाला द्या, असा आग्रह भाजपाकडून होऊ शकतो. या शिवाय साताराची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपाला हवी आहे. पालघरची भाजपाकडील जागा शिवसेनेला दिली जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
ठाकरे घराण्याची परंपरा मोडणार, आदित्य स्वत: लोकसभा लढणार?
By यदू जोशी | Published: March 12, 2019 6:12 AM