- प्रसाद गो. जोशीगुजरातमधील गांधीनगरची जागा ही भाजपाचा गड असून, तेथे आगामी निवडणुकीत भाजपा कोणाला उमेदवारी देणार, याविषयी उत्सुकता आहे. विद्यमान खासदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाने त्यांच्यावरच सोडला आहे. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी येथून षटकार मारणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार याबाबत विविध अटकळी आहेत.गांधीनगरमध्ये १९८९ पासून भाजपाने पाय रोवले आहेत. भाजपाला इथे हरविणे अशक्यप्रायच आहे. गेल्या निवडणुकीमध्ये लालकृष्ण अडवाणी येथून ४ लाख ८३ हजार १२१ च्या मताधिक्याने विजयी झाले. पण ९१ वर्षांचे अडवाणी यंदा निवडणूक लढविणार का, हे स्पष्ट झालेले नाही.भाजपाने ७५ वर्षांवरील कोणाला उमेदवारी न देण्याचे ठरविले असले तरी अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांचा अपवाद केला आहे. त्यांनी निवडणूक लढवायची का, याचा निर्णय पक्षाने त्यांच्यावरच सोडला आहे; मात्र त्यांनी काहीही खुलासा केलेला नाही.भाजपाच्या शंकरसिंह वाघेला १९८९ मध्ये येथून विजयी झाले. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपाकडे आहे. अडवाणी यांनी १९९१ मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढविली. अटलबिहारी वाजपेयी १९९६ मध्ये विजयी झाले. पण लखनौमधूनही विजयी झाल्याने त्यांनी गांधीनगरचा राजीनामा दिला. नंतर पोटनिवडणुकीत भाजपाचेच हरिश्चंद्र पटेल निवडून आले. त्यानंतर अडवाणी यांनी हा मतदारसंघ राखला. यंदा मात्र भाजपा येथून नवा चेहरा देणार असल्याची चर्चा आहे. अडवाणी यांचे वाढते वय लक्षात घेता त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय राहू नये, असे पक्षात मत आहे.>काँग्रेसमध्ये अस्वस्थतागुजरात काँग्रेसमधील घडामोडींमुळे नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. पाटीदार नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. ओबीसी नेते व काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी त्याचा इन्कार केला आहे.काँग्रेसचे जवाहर चावडा यांनीशुक्रवारी आमदारकीचा राजीनामा विधानसभाध्यक्षांकडे सोपवला. तेही ओबीसी नेते आहेत. गेल्या जुलैमध्ये काँग्रेसचे कुवरजी बवालिया यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, तर गेल्या महिन्यात आमदारकी सोडून आशा पटेल यांनी भाजपात प्रवेश केला.
गांधीनगरमधून अडवाणी की नवीन चेहरा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 4:51 AM