लखनऊ: काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर आता रेल्वेनं लोकांशी संपर्क साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियंका गांधी 27 मार्चला दिल्ली ते फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करणार आहेत. ही यात्रा करताना त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधतील. याआधी प्रियंका गांधींनी प्रयागराज ते वाराणसी दरम्यान नौका यात्रा करत मतदारांशी संवाद साधला होता. प्रियंका गांधींनी सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांच्या प्रचार अभियानाची सुरुवात प्रयागराजमधील हनुमान मंदिरात पूजा करुन केली. त्यानंतर त्यांनी गंगा नदीचीदेखील पूजा केली. विंध्याचल मंदिरात जाऊन त्यांनी विंध्यवासिनी देवीचं दर्शनदेखील घेतलं. यानंतर त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देत दशाश्वमेध घाटाचा दौरा केला. आता प्रियंका अयोध्येला जाणार आहेत. प्रियंका गांधींचे वाढते दौरे भाजपासाठी अडचणीचे ठरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियंका गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य करत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी अयोध्येत रोड शो करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कोणकोणत्या पवित्र स्थळांना भेटी देणार याबद्दलची माहिती अद्याप काँग्रेसकडून देण्यात आलेली नाही. 'प्रियंका गांधी दिल्लीहून कैफियत एक्स्प्रेसनं फैजाबादला येतील. त्यांची ट्रेन पहाटे साडेपाचच्या सुमारास फैजाबाद पोहोचेल,' अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राजेंद्र प्रताप सिंह यांनी दिली. फैजाबाद रेल्वे स्थानकाजवळील हॉटेलमध्ये थोडा वेळ थांबल्यानंतर त्या सकाळी 10 च्या सुमारास अयोध्येत रोड शो करतील. हा रोड शो 50 किलोमीटरचा असेल. कुमारगंजमध्ये रोश शोची समाप्ती होईल, असं सिंह यांनी सांगितलं.
आता प्रियंका करणार अयोध्यावारी; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाला घेरण्याची तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 10:32 AM