मुंबई – राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले आहेत, बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या वैद्यकीय खात्याच्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील एक निर्णय घेण्यात आला, हा निर्णय CMO च्या अधिकृत ट्विटर याची माहिती देताना संभाजीनगर(औरंगाबाद) असा उल्लेख करत पोस्ट करण्यात आली. त्यावरून राजकारण रंगू लागलं आहे.
CMO च्या ट्विटवरून काँग्रेसचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चांगलेच संतापले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असं स्पष्ट केले आहे.
तर या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे, अजितदादा म्हणाले की, बुधवारी रात्रीपासून या विषयावर बातम्या ऐकायला मिळत आहेत, मला याबाबत काहीच माहिती नाही, सकाळपासून मी जनता दरबार घेत आहे, त्यामुळे आता मंत्रालयात गेल्यावर संबंधित पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बसून चर्चा करू, आम्ही समान किमान कार्यक्रम घेऊन सरकार चालवत आहोत, त्यामुळे एकत्र बसून यावर निर्णय घेऊ असं नामांतरणाच्या वादावर अधिकचं भाष्य करणं टाळलं आहे.
त्याचसोबत कोणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणी भावनिक मुद्दे काढतं तर कोणी विकासाच्या मुद्द्यावर बोलतं, गेल्या ६० वर्षापासून महाराष्ट्रात हेच सुरू आहे, आज औरंगाबादबद्दल बोललं जातंय, उद्या पुणे, अहमदनगर, नाशिक वैगेरे अनेक शहरांबाबत बोललं जाईल, त्यामुळे मागणी करण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही, लोकशाही पद्धतीत निवडून आलेले सत्ताधारी बहुमताच्या जोरावर शहरांची नावं बदलतात हे मायावतींनी केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे विकासाला आम्ही महत्त्व दिलं आहे. तीच भूमिका घेऊन सरकार पुढे चाललं आहे असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.
भाजपाचा शिवसेनेला टोला
काँग्रेसने ‘ठणकाऊन’ सांगितल्यावर आता शिवसेना काय म्हणणार? विकासाच्या मुद्द्यांवर शिवसेनेला सांगण्यासारख काहीच नाही म्हणून भावनिक मुद्दे. आता नामांतराचा प्रस्ताव थेट कॅबिनेटमध्ये आणून उत्तर देणार? का ठणकावलं की सत्तेसाठी लाचारी पत्करत गपगुमान बसणार? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सत्ताधारी शिवसेनेला विचारला आहे.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय येथे नव्याने १६५ खाटा आणि ३६० पदांच्या निर्मितीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली, काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला आहे. काँग्रेसचा औरंगाबादच्या नामांतरणाला स्पष्ट विरोध असल्याचे आधीच जाहीर आहे. मात्र असं असतानाही मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असं केल्याने महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ३ ट्विट करत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.