नवी दिल्ली - संसदेने तीन प्रमुख कामगार सुधारणा विधेयके मंजूर केली आहेत. यानुसार कंपनी बंद करण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच तीनशे कर्मचारी असलेल्या कंपन्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढता येणार आहे. आठ खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असताना राज्यसभेने आवाजी मताने औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यवसाय सुरक्षेशी संबंधित तीन कामगार विधेयकांना मंजुरी दिली. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
राहुल गांधी यांनी कामगार सुधारणा विधेयकांवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन" असं म्हणत ट्विटरवरून निशाणा साधला आहे. राहुल यांनी गुरुवारी (24 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "शेतकऱ्यांनंतर कामगारांवर वार. गरीबांचं शोषण, मित्रांचं पोषण, हेच आहे मोदीजींचं शासन" असं म्हणत मोदींवर जोरदार टीका केली आहे. तसेच या संबंधीत एका बातमीचा फोटोही ट्विट केला आहे.
'बदलत्या व्यावसायिक वातावरणाला योग्य अशी पारदर्शक प्रणाली तयार करणे, हा या कामगार सुधारणांचा हेतू आहे. रोजगारनिर्मितीसाठी कर्मचारी मर्यादा १०० ठेवणे उचित नाही. ही मर्यादा वाढविण्यात आल्याने रोजगारनिर्मिती होईल आणि नोकरभरतीला चालना मिळेल. या विधेयकांमुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य महामंडळाच्या व्याप्ती वाढवून कर्मचाऱ्यांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा मिळेल' असं कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं आहे.
"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"
गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले व वाढवलेले संबंध मोदींनी संपुष्टात आणले असा आरोप आता राहुल यांनी केला आहे. "मोदींनी गेल्या अनेक दशकांमध्ये काँग्रेसने (अनेक देशांबरोबर) निर्माण केलेले चांगले संबंध संपुष्टात आणलेत. आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक आहे" असं एक ट्विट केलं आहे. यासोबतच भारताचे बांगलादेशसोबत बिघडत असलेले संबंध आणि त्यांची चीनशी वाढत असलेली जवळीक यासंबंधीत असलेल्या एका बातमीचा फोटोही पोस्ट केला आहे.
राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर निशाणा साधला होता. ''मोदींनी शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास केला'' अशी जोरदार टीका केली होती. पंतप्रधानांना राहुल गांधी यांनी त्यांच्या काही आश्वासनांची आठवण करून दिली आहे. "2014 - मोदीजींचे निवडणुकीचे आश्वासन स्वामीनाथन आयोगाचा MSP, 2015 - मोदी सरकारने न्यायालयात सांगितले की हे त्यांच्याकडून होणार नाही, 2020 - काळा शेतकरी कायदा. मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न, शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून, भांडवलदारांचा मोठा विकास" असं राहुल गांधी यांनी याआधी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च
शाब्बास पोरी! चिमुकलीने केली Google ची मदत, हटवले कोट्यवधींची कमाई करणारे स्कॅम अॅप्स
टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?
काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब
"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"