Jitin Prasad: जितिन प्रसाद यांचं भाजपात उज्ज्वल भविष्य; काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:12 AM2021-06-10T09:12:07+5:302021-06-10T09:15:49+5:30
पक्षाच्या हायकमांडला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवेन असं आदिती म्हणाल्या.
लखनौ – काँग्रेस नेता जितिन प्रसाद(Jitin Prasad) यांनी भाजपात प्रवेश केल्यानं उत्तर प्रदेशात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपा(BJP) प्रवेशानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरूवात झाली आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदार आदिती सिंह(Congress Rebel MLA Aditi Singh) यांनीही यावर भाष्य केले आहे.
आमदार आदिती सिंह म्हणाल्या की, पक्षाच्या हायकमांडला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवेन. जितिन प्रसाद यांचे पक्ष सोडणं काँग्रेससाठी तोट्याचं आहे. ज्येष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेशच्या ग्राऊंड लेव्हलवर उतरून काम करण्याची गरज आहे. पक्षाचे दिग्गज नेते पक्ष का सोडत आहेत? यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं आदिती सिंह म्हणाल्या.
तसेच उत्तर प्रदेशच्या राजकीय आखाड्यात काँग्रेसनं काम करण्याची आवश्यकता आहे. मी सत्य आणि स्पष्ट सांगते. माझं म्हणणं जर कोणाला वाईट वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. मी प्रियंका गांधी यांच्यावर काही टीप्पणी केली नाही मात्र त्यांना प्रत्यक्षात हे सगळं पाहायला हवं. जितिन प्रसाद यांचे काँग्रेसमधून जाणं हे पक्षासाठी मोठं नुकसान आहे. ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद असे नेते पक्ष काय सोडतायेत यावर विचार व्हावा. काँग्रेस एका घराण्याचा पक्ष बनत चाललाय. जितिन प्रसाद यांचे भाजपात उज्ज्वल भविष्य आहे असंही आमदार आदिती सिंह यांनी सांगितले.
कोण आहेत जितिन प्रसाद?
ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही लढविली होती.
जितिन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहाँपूर आणि २००९ मध्ये धौरहर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये ते युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री व नंतर पोलाद, मार्ग परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री होते. २०११-१२ पर्यंत पेट्रोलियम आणि २०१२-१४ पर्यंत मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती.