प्रकाश आंबेडकरांनंतर आता बसपा प्रमुख मायावतींना रामदास आठवलेंची खास ऑफर
By प्रविण मरगळे | Published: February 28, 2021 03:25 PM2021-02-28T15:25:29+5:302021-02-28T15:28:14+5:30
Ramdas Athvale News: आठवले दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत, तत्पूर्वी आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली.
लखनौ – गेल्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा नारा दिला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते लखनौ येथे बोलत होते, या कार्यक्रमात आठवलेंनी बहुजन समाजवादी पार्टीच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayawati) यांना थेट रिपब्लिकन पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. (RPI Leader Ramdas Athvale Offer to Mayawati for join RPI Party before Uttar pradesh Assembly Elections)
आठवले दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर आहेत, तत्पूर्वी आठवले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री डॉ.दिनेश शर्मा यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवले(Ramdas Athvale) म्हणाले की, रिपब्लिकन पक्ष हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे. त्यामुळे जे लोक स्वतःला आंबेडकरवादी मानतात त्यांनी त्यांचे पक्ष विसर्जित करून रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. बसपा प्रमुख बहन मायावती आणि भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी रिपब्लिकन पक्षात आले पाहिजे. जर मायावती या रिपब्लिकन पक्षात आल्या तर त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करून मी स्वतः उपाध्यक्ष होईल असं विधान आठवलेंनी केले आहे. यापूर्वीही रामदास आठवलेंनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनाही रिपब्लिकन ऐक्यासाठी पक्षात येण्याची ऑफर दिली होती
तसेच देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना १५ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी आठवले यांनी पुन्हा एकदा केली, २०२२ च्या आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजपासोबत युती करेल. जो पर्यंत राहुल गांधी काँग्रेसमध्ये आहेत तो पर्यंत काँग्रेसचे काही भले होणार नाही असा टोलाही रामदास आठवलेंनी काँग्रेसला लगावला आहे.
लखनौ येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यास रामदास आठवले यांनी संबोधित केले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच या वेळी विधान सभा निहाय पक्ष प्रभारिंची नियुक्ती रामदास आठवले यांनी केली.आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा विजयी लहरू द्या असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी रिपाइंचे उत्तर प्रदेश अध्यक्ष पवन गुप्ता, जवाहर अशोक पांडेय, हेंसू राम, श्याम सुंदर सिंह, जितेंद्र जैसवाल, हेमंत सिंह, जय कुमार पांडे, बलविर सिंह आदी पदाधिकारी उपस्थित होते.