मुंबई - आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष असलेल्या नानांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, या विधानावरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढू लागल्यानंतर नाना पटोले यांनी सारवासारव सुरू केली आहे. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. काल्पनिक कहाण्या रचून राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव विरोधकांनी आखला आहे. मात्र आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगत नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. (After the sensational allegations of surveillance,Nana Patole's explanation, Said perverted my statement )
आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, सध्या आमच्याविरोधात काल्पनिक कहाण्या रचण्याचे काम सुरू आहे. मी पुण्यात असताना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो की, राज्यात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये वाढ झाली आहे. आमचे दौरे सुरू आहेत. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. तसेच राज्य सरकारसोबतच असा अहवाल केंद्र सरकारकडेही जात असतो. प्रत्येत घडामोडीची माहिती राज्य आणि केंद्र सरकारला मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याची, विभागाची माहिती सरकारला मिळत असते. तशीच माझी आणि पक्षाच्या इतर नेत्यांची माहितीही दिली जात असते, ही प्रक्रिया मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा उल्लेख काढला गेला.
दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी आमचे वैर नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल. मात्र भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यासाठी काल्पनिक कहाण्या पेरल्या जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
नाना पटोलेंनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. माझ्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला कापरे भरल्याचे फडणवीस म्हणत आहेत. मात्र या फडणवीसांचं सरकार असताना माझे फोन टेप केले गेले होते, ते काय होतं? तेव्हा तुम्हालाही भीती वाटली होती का, असा सवालही नाना पटोलेंनी विचारला. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलं तर त्यांची भेट घेईन, असेही पटोलेंनी सांगितले. त्याबरोबरच शरद पवार यांनी त्यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.