पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला(BJP) धक्का दिल्यानंतर आता तृणमूल काँग्रेस(TMC)नं त्रिपुरामध्येहीभाजपा बंडखोरांना पक्षात सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. भाजपातील बंडखोरांना टीएमसीत घेण्याची जबाबदारी अलीकडेच भाजपातून आलेल्या मुकुल रॉय यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षातील लोकांनी बंडखोरी केल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महासचिव बीएल संतोष यांच्या नेतृत्वाखाली एक पथक संघटनात्मक बांधणीसाठी राज्यात पाठवलं आहे.
या समितीत आसाम, त्रिपुराचे भाजपा संघटनेचे सचिव फणींद्रनाथ शर्मा, पूर्वोत्तर महासचिव अजय जामवाल, राज्य प्रभारी विनोद सोनकर यांचा समावेश आहे. ही समिती भाजपा प्रदेशाध्यक्ष माणिक साहा आणि सर्व जिल्हाध्यक्षांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, कॅबिनेट सहकारी आणि खासदारांचीही बैठक घेणार आहेत. भाजपा प्रवक्ते नबेंद्रु भट्टाचार्य म्हणाले की, या बैठकींचा उद्दिष्ट संघटन मजबूत करणं आहे. महामारीच्या काळात भाजपा नेत्यांनी अधिक सक्रीय होणं गरजेचे आहे असं पक्षाच्या नेतृत्वाला वाटतं.
तसेच त्रिपुराचे लोक जागरूक आहेत. ते बाहेरच्या पक्षांना थारा देणार नाहीत. मुळात या लोकांनी बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं केलेला हिंसाचार पाहिला आहे. त्यामुळे टीएमसीचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. केंद्रीय नेतृत्वाने पक्षातील नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम पक्षाचे नेतृत्व करत आहेत असं भट्टाचार्य म्हणाले. तर पक्षात कोणतेही मतभेद नाहीत सर्व ठीक आहे असं प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनी सांगितले.
मुकुल रॉय मुरलेले राजकारणी
मुकुल रॉय ते नेते आहेत ज्यांनी २०१६ मध्ये ६ काँग्रेस नेत्यांना टीएमसीमध्ये आणलं होतं. तेव्हा काँग्रेसनं त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केली होती. त्यानंतर मुकुल रॉय यांनीच त्या ६ आमदारांना भाजपात घेऊन गेले होते. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पुन्हा जिंकल्यानंतर टीएमसीनं घोषणा केली होती की, भाजपाला आव्हान देण्यासाठी आगामी काळात पक्षाचा विस्तार बाहेरच्या राज्यातही केला जाईल.
मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर आमदार नाराज
त्रिपुरा भाजपातील काही आमदार मुख्यमंत्री बिप्लब देब यांच्यावर नाराज होते. मागील ऑक्टोबरमध्ये हे आमदार दिल्लीत गेले होते. आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा आणि बीएल संतोष यांची भेट घेतली. मुख्यमंत्री बिप्लब देब यांना हटवण्याची मागणी या आमदारांनी केली होती. यातील बहुतांश आमदार हे काँग्रेस आणि टीएमसीतून आलेले आहेत. २०१८ मध्ये हे भाजपात सहभागी झाले. त्यामुळे विचारधारा, पक्ष आणि तत्त्व या आमदारांसाठी नगण्य आहे. दुसऱ्या पक्षांना हे आमदार फोडणं सहज शक्य आहे.